कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लावा
By Admin | Updated: January 28, 2017 01:20 IST2017-01-28T01:20:05+5:302017-01-28T01:20:05+5:30
स्थानिक नगर पालिकेंतर्गत अनेक कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या विविध मागण्या व समस्या आजतागायत कायम आहेत.

कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लावा
निवेदन सादर : कास्ट्राईब न.प. कर्मचारी संघटनेचे नगराध्यक्षांना साकडे
गडचिरोली : स्थानिक नगर पालिकेंतर्गत अनेक कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या विविध मागण्या व समस्या आजतागायत कायम आहेत. त्यामुळे न.प. कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. सदर समस्या तत्काळ मार्गी काढण्यात याव्या, अशी मागणी कास्ट्राईब नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.
कास्ट्राईब न.प. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र उईके, सचिव रवींद्र पटले यांच्या नेतृत्वात संघटनेचे कार्यकर्ते व पालिकेचे कर्मचाऱ्यांनी नगर परिषद कार्यालयात जाऊन नगराध्यक्ष योगीता पिपरे यांची भेट घेतली. त्यांच्याशी समस्यांबाबत विस्तृत चर्चा केली. नगर परिषद कर्मचारी व शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या १ तारखेस अदा करण्यात यावे, शिक्षकांना सेवेत १२ वर्ष होऊनही वरिष्ठ वेतन श्रेणी अद्याप लागू करण्यात आली नाही. सदर वेतनश्रेणी तत्काळ लागू करण्यात यावी, शिक्षकांची बिंदू नामावली (रोस्टर) अद्यावत करण्यात यावे, १२ वर्ष सेवा पूर्ण झालेल्या न.प. कर्मचाऱ्यांना शासन नियमाप्रमाणे त्वरीत पदोन्नती देण्यात यावी, आरटीई २००९ च्या कायद्यानुसार मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षकांच्या जागा तत्काळ भरण्यात याव्या, न.प. कर्मचारी व शिक्षकांच्या सेवा पुस्तिकेत वाढीव अर्हतेची नोंद तत्काळ घेण्यात यावी तसेच कर्मचाऱ्यांना सेवा पुस्तिकेची दुय्यम प्रत देण्यात यावी, आदी मागण्यांचा समावेश आहे.
दरम्यान नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी पालिकेच्या शिक्षण विभागाची व इतर विभागाच्या प्रमुखांची तत्काळ बैठक घेऊन समस्या मार्गी काढण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना यावेळी दिली. निवेदन देताना न.प. कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)