मारहाण करणाऱ्या आरोपीस पाच वर्षांची शिक्षा
By Admin | Updated: June 18, 2016 00:51 IST2016-06-18T00:51:11+5:302016-06-18T00:51:11+5:30
गावातील एका इसमासोबत भांडण करून काठीने जबर मारहाण करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ...

मारहाण करणाऱ्या आरोपीस पाच वर्षांची शिक्षा
न्यायालयाचा निर्णय : नोव्हेंबर २०१३ मध्ये घडली घटना
गडचिरोली : गावातील एका इसमासोबत भांडण करून काठीने जबर मारहाण करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपी इसमास गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी भादंविचे कलम ३०४ भाग २ अन्वये पाच वर्षाची शिक्षा व १० हजार रूपयांचा दंड ठोठावला.
मनोहर पत्रू टेकाम (४०) रा. राजगाटा माल असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर मारोती बालाजी मेश्राम (३६) रा. राजगाटा माल असे मारहाणीत जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.
मृत्यू झालेल्या दिवशी मृतक मारोती मेश्राम यांच्या पत्नीने गडचिरोली पोलीस ठाणे गाठून या घटनेची तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी मनोहर टेकाम याच्या विरोधात भादंविचे कलम ३०४ अन्वये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तत्कालीन पोलीस निरिक्षक घनश्याम पलंगे यांनी सदर प्रकरणाचा तपास पूर्ण करून आरोपी मनोहर टेकाम याच्या विरोधात जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
प्रमुख सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी साक्षीपुरावे तपासून व दोन्ही बाजुच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून शुक्रवारी आरोपी मनोहर टेकाम यास भादंविचे कलम ३०४ भाग २ अन्वये पाच वर्षाची शिक्षा तसेच १० हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिन्याची शिक्षा सुनावली. भादंविचे कलम ५०६ अन्वये सहा महिन्याची शिक्षा व ५०० रूपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा सुनावली. सदर खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता सचिन कुंभारे यांनी काम पाहिले. (स्थानिक प्रतिनिधी)
असा घडला थरार
३ नोव्हेंबर २०१३ रोजी मनोहर पत्रू टेकाम याने गावातीलच मारोती बालाजी मेश्राम याचेसोबत भांडण केले. त्यानंतर काठीने जबर मारहाण केली. यात मारोती मेश्राम हा गंभीर जखमी झाला. मारोती मेश्राम यांची मुलगी हिने सदर प्रकार पाहिला. त्यानंतर तिने घरात जाऊन या घटनेची माहिती आपल्या आईला दिली. मारोती मेश्राम यांची पत्नी घटनास्थळावर येऊन पाहणी केली असता, मनोहर टेकाम हा काठी घेऊन उभा होता. कशासाठी मारहाण केली, असे विचारणा केली असता, मनोहर टेकाम याने तिलाही मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मारोती मेश्राम यांची पत्नीने नातेवाईकाच्या सहकार्याने जखमी झालेले आपले पती मारोती मेश्राम यांना गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान ९ नोव्हेंबर २०१३ रोजी त्याचा मृत्यू झाला.