पाच दुकाने जळून खाक
By Admin | Updated: April 28, 2015 02:07 IST2015-04-28T02:07:33+5:302015-04-28T02:07:33+5:30
येथील तळेगाव मार्गावर असलेल्या आठवडी बाजार परिसरात असलेल्या दुकानांना रविवारी रात्री १०.३० ते ११

पाच दुकाने जळून खाक
कुरखेड्यातील बाजारपेठेला आग : पाच लाखांचे नुकसान
कुरखेडा : येथील तळेगाव मार्गावर असलेल्या आठवडी बाजार परिसरात असलेल्या दुकानांना रविवारी रात्री १०.३० ते ११ वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याने पाच दुकाने जळून खाक झाली. यामुळे दुकानदारांचे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही.
रविवारी सायंकाळच्या सुमारास कुरखेड्यात वादळ आले होते. त्यानंतर रात्री १०.३० वाजताच्या सुमारास अचानक दुकानांना आग लागली. वादळामुळे आग पसरल्याने लगतची दुकानेही अग्निलोळात सापडली. यामुळे पाच दुकाने संपूर्णत: जळाली, तर एका दुकानाचे अंशत: नुकसान झाले. खुशाल नंदेश्वर यांच्या टेलिरिंग दुकानमधील शिवणयंत्रे व शिवलेले कापड भस्मसात झाले. यामुळे त्यांचे ९७ हजारांचे नुकसान झाले. सोमनाथ पोरेटी यांचेही टेलरिंग दुकान आगीच्या कचाट्यात सापडल्याने शिवणयंत्रे व कापड असे सुमारे एक लाख १६ हजार रुपयांच्या साहित्याची राखरांगोळी झाली. सदाशिव कुमरे यांच्या संगीत वाद्याच्या दुकानालाही आगीने वेढल्याने त्यांचे एक लाख ६५ हजारांचे नुकसान झाले. वसंत राऊत यांच्या टेलरिंग दुकानमधील शिवणयंत्रे व कापड जळाले. त्यामुळे त्यांची ९७ हजारांची हानी झाली. श्रावण बैसाकू यांच्या सायकल स्टोअर्समधील १५ सायकली व सुटे भाग आगीमुळे जळाले. परिणामी त्यांना ९२ हजारांचे नुकसान सहन करावे लागले. या दुकानांच्या आगीची झळ शेजारच्या प्रकाश दहीकर यांच्या चहाटपरीला पोहचली. त्यांचे सात हजारांचे नुकसान झाले. सोमवारी सकाळी कुरखेडाचे तलाठी सोनकुसरे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. (तालुका प्रतिनिधी)
आमदारांनी भेट देऊन केली पाहणी
कुरखेडातील बाजारपेठेला आग लागून दुकाने जळून खाक झाल्याची घटना माहित होताच आमदार क्रिष्णा गजबे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच आपदग्रस्त दुकानदारांची आस्थेने विचारपूस केली. शासनाकडून दुकानदारांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न करु, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. याप्रसंगी गणपत सोनकुसरे, चांगदेव फाये, बंडू लांजेवार, हरिश्चंद्र डोंगरवार उपस्थित होते.