दुर्गम भागातील पाच शाळा सोलर लाईटमुळे प्रकाशमान
By Admin | Updated: September 5, 2015 01:31 IST2015-09-05T01:31:33+5:302015-09-05T01:31:33+5:30
आदर्श मित्र मंडळ पुणेच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील पाच शाळांना इर्न्व्हटर सोबतच सोलर लाईट लावण्यात आले आहेत.

दुर्गम भागातील पाच शाळा सोलर लाईटमुळे प्रकाशमान
उदय जगताप यांची माहिती : आदर्श मित्र मंडळ पुणेचे सहकार्य
गडचिरोली : आदर्श मित्र मंडळ पुणेच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील पाच शाळांना इर्न्व्हटर सोबतच सोलर लाईट लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर पुढील महिन्यात आकाश दुर्बिण व १०० शाळांना खेळाचे संपूर्ण साहित्य उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती पुणे येथील आदर्श मित्र मंडळाचे उदय जगताप यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली.
गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये उपजत गुणवत्ता आहे. मात्र सोयीसुविधा व संधी उपलब्ध होत नसल्याने या गुणवत्तेचा विकास होत नाही. ही बाब लक्षात आल्यानंतर आदर्श मित्र मंडळाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. एक महिन्यांपूर्वी २०० विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले. त्यानंतर आता आदर्श मित्र मंडळ, तुळशीबाग गणेश मंडळ पुणे, मेहुनपुरा मंडळ, हिंद तरूण मंडळ पुणे व लक्ष्मी नुरसिंह पतसंस्था बल्लारशाह यांच्या संयुक्त विद्यमाने गरंजी, आडगेपल्ली, बोलेपल्ली, हेमलकसा व देवदा येथील शाळांमध्ये सोलर लाईट लावण्यात आले आहे. या पाचही शाळांमधील सोलर लाईट व इर्न्व्हटर शुक्रवारी सुरू होतील. त्याच्या संपूर्ण देखभालीचा खर्च मंडळ उचलणार आहे. दोन ट्यूबलाईट राहणार असून बॅटरी बॅकअप सहा तास चालणार आहे.
पुढील महिन्यात १०० शाळांना खेळाचे साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्याचबरोबर आकाश दुर्बिण सुद्धा दिली जाणार आहे. सदर दुर्बिण प्रत्येक शाळेत नेऊन विद्यार्थ्यांना आकाशगंगा बघण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना आयएसएसची तयारी करायची आहे, अशा पाच विद्यार्थ्यांना पुणे येथे क्लासेस लावून त्यांचा संपूर्ण खर्च मंडळ उचलेल, अशी सुद्धा माहिती उदय जगताप यांनी दिली. आपण खर्च करीत असलेला पैसा शासनाचा नसून आपल्या कष्टाचा आहे. त्यामुळे पैशाचा सदुपयोग व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी पत्रकार परिषदेदरम्यान व्यक्त केली. यावेळी श्रीनिवास सुंचुवार, नितीन पंडित उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)