पाच लाखांचे सागवान लठ्ठे जप्त

By Admin | Updated: December 6, 2015 01:17 IST2015-12-06T01:17:23+5:302015-12-06T01:17:23+5:30

चारचाकी वाहनाच्या माध्यमातून सागवानाच्या लठ्यांची तस्करी करणाऱ्या वाहनाला चामोर्शी तालुक्यातील श्रीनिवासपूर येथे पकडून वाहनासह ४ लाख ७१ हजार ४६४ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Five lakh sagafuls were seized | पाच लाखांचे सागवान लठ्ठे जप्त

पाच लाखांचे सागवान लठ्ठे जप्त

चामोर्शी : चारचाकी वाहनाच्या माध्यमातून सागवानाच्या लठ्यांची तस्करी करणाऱ्या वाहनाला चामोर्शी तालुक्यातील श्रीनिवासपूर येथे पकडून वाहनासह ४ लाख ७१ हजार ४६४ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई ३ डिसेंबरच्या रात्री करण्यात आली.
सागवानी लठ्ठे भरलेले वाहन चामोर्शीकडे येत असल्याची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्राप्त झाली. त्यानुसार वन परिक्षेत्राधिकारी ए. एस. ताल्हन यांनी वन कर्मचारी व पोलीस यांच्यासह चामोर्शी-आमगाव व चामोर्शी-घोट मार्गावर पाळत ठेवली होती. दरम्यान, रात्री दीड वाजताच्या सुमारास कर्कापल्ली फाट्यावर एक दुचाकी वाहन भरधाव वेगाने येत असल्याचे दिसून आले. सदर वाहन अडवून त्याची चौकशी सुरू असताना चारचाकी वाहन पळून जाण्यात यशस्वी झाले. तेव्हा वनाधिकाऱ्यांचा ताफा चामोर्शी मार्गाने शोध घेत होता. दरम्यान श्रीनिवासपूर गावात शोध मोहीम राबविली असता, रात्री ३ वाजताच्या सुमारास भवतोश सद्दमवार यांच्या शेतात एमएच ३३/४९९७ ही चारचाकी वाहन चिखलात फसले असल्याचे दिसून आले. येथील आरोपी पळून गेले. वाहनाच्या तपासणीदरम्यान त्यामध्ये आठ सागवानी लठ्ठे आढळून आले. ४ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता गावातील पंचासमक्ष पंचनामा करण्यात आला. पकडलेल्या एमएच ३३ ई ८०१८ या दुचाकीवरील इसमांची चौकशी केली असता, मुख्य आरोपी विकासपल्ली येथील समीर शांती शील असल्याचे सांगितले. तो सुध्दा फरार झाला. जप्त केलेला सागवान माल व वाहनाची किमत ४ लाख ७१ हजार ४६४ एवढी आहे. आमगाव नियत क्षेत्राचे वनरक्षक एस. बी. झाडे यांनी चार दिवसांपासून घटनेची गुप्त माहिती काढली होती. यातील आरोपी घरामी रा. श्रीनिवासपूर व रतन अमुल्य हलदर रा. गरंजी यांना न्यायालयात हजर केले असता, ६ डिसेंबरपर्यंत वनकोठडी सुनावली आहे. सदर कारवाई आलापल्ली वन विभागाचे उपवनसंरक्षक मिना व सहायक वनसंरक्षक डी. आय. तिरपुडे यांच्या मार्गदर्शनात चामोर्शीचे वन परिक्षेत्राधिकारी ए. एस. ताल्हन, क्षेत्र सहायक आर. के. जेल्लेवार, क्षेत्र सहायक एस. सी. गुरनुले, वनपाल आर. डी तोकला, वनरक्षक एस. बी. झाडे, जे. टी. निमसरकार, राठोड, मारोती मनकेवार, शामराव आदे, मनोहर वासेकर, रविंद्र अलबनकर यांनी पार पाडली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Five lakh sagafuls were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.