मार्कंडा पर्यटन विकासासाठी पाच कोटींच्या कामाचे नियोजन
By Admin | Updated: June 6, 2016 02:16 IST2016-06-06T02:16:04+5:302016-06-06T02:16:04+5:30
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव पर्यटनस्थळाच्या विकासासाठी प्रदीर्घ काळापासून होत

मार्कंडा पर्यटन विकासासाठी पाच कोटींच्या कामाचे नियोजन
चामोर्शी : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव पर्यटनस्थळाच्या विकासासाठी प्रदीर्घ काळापासून होत असलेली मागणी आता मार्गी लागली आहे. आमदार डॉ. देवराव होळी यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाने पाच कोटी रूपये मार्र्कंडा पर्यटन विकासासाठी मंजूर केले आहे. यापैकी काही रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त झाली असून या विभागाने मार्र्कंडा पर्यटन विकासाचा आराखडा तयार केला आहे.
आमदार डॉ. देवराव होळी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता गावळ यांच्यासह मार्र्कंडा येथे जागेची पाहणी करून प्रत्यक्ष कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली आहे. आमदार डॉ. देवराव होळी व उपअभियंता गावळ यांनी दिलेल्या नियोजन आराखड्याची माहिती दिली. तसेच त्याची अंमलबजावणी तत्काळ सुरू करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
मार्र्कंडा येथे बायपासची गरज असून बायपाससाठी गावकऱ्यांचा आग्रह व शेतीमालकाचे नाहरकत प्रमाणपत्र देण्याची तयारी दिसून येत असल्याने ‘त्या’ संभावित बायपास मार्गाची पाहणी आमदार डॉ. देवराव होळी व उपअभियंता गावळ यांनी केली आहे. नदीघाटावर पायऱ्यांची गरज लक्षात घेऊन नदी घाट विकासाचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी मार्र्कंडा देवस्थान ट्रस्ट व नागरिकांनी केली आहे. आमदार डॉ. होळी यांच्या प्रयत्नाने शासनाने पाच कोटी रूपये मार्र्कंडा विकासासाठी दिले. परिणामी सार्वजनिक बांधकाम विभाग तातडीने कामाला लागले. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
पुरातत्व विभागाने देखील मार्र्कंडा विकासाची दखल घेतली असल्याने मार्र्कंडा तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र म्हणून जगाच्या नकाशावर स्थान मिळवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पाहणीदरम्यान आ. डॉ. देवराव होळी, तहसीलदार यु. जी. वैद्य, उपअभियंता गावळ, सरपंच ललिता मरस्कोल्हे, उपसरपंच सेविकांत आभारे, ग्रा.पं. सदस्य खुशाल कुळसंगे, यु. एन. जुनघरे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, मनोज पालारपवार, प्रशांत एगलोपवार, दिलीप चलाख, माणिक कोहळे, नरेंद्र अलसावार, जयराम चलाख, ग्रामसेवक सराटे आदीसह नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
अशा होतील सुविधा
४मार्र्कंडा येथे पोचमार्गावर ८६ लाख, टॅक्सी पार्किंग व सुविधा बांधकामासाठी ३२ लाख, रिसोर्ट कॉटेज इमारत ९९.१९ लाख, पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसाठी ९.९५ लाख, निरीक्षण मनोरा बांधकाम ४१.५४ लाख, सुलभ शौचालय १९.९० लाख, जाहिरात पोर्टल, गेट सुरक्षा बांधकामासाठी ८.६७ लाख, भूमिगत गटार व फूटपाथसाठी ९७ लाख, पाण्यातील खेळ व नौकाविहार १.६० लाख, नदी किनारा विकासकामांसाठी ९९.५७ लाख व इतर कामांसाठी पाच लाख असे एकूण ४९५.३६ लाखाच्या कामांचे नियोजन करण्यात आले.