मत्स्य व्यवसायातून रोजगार निर्मिती शक्य
By Admin | Updated: August 3, 2016 02:10 IST2016-08-03T02:10:02+5:302016-08-03T02:10:02+5:30
गडचिरोली जिल्हयात मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून उपजिविका सधी सोबतच पोषणमुल्य वृध्दी अशी दोन्ही उद्दिष्टे साधण्याची क्षमता आहे.

मत्स्य व्यवसायातून रोजगार निर्मिती शक्य
जिल्हाधिकाऱ्यांचा विश्वास : मुरखळाच्या मत्स्य संवर्धन केंद्राची केली पाहणी
गडचिरोली : गडचिरोली जिल्हयात मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून उपजिविका सधी सोबतच पोषणमुल्य वृध्दी अशी दोन्ही उद्दिष्टे साधण्याची क्षमता आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी दिली. मत्स्य व्यवसाय विकास क्षमतांची माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी येथून जवळच असलेल्या मुरखळा येथील मत्स्य व्यवसाय विभागाच्या मत्स्य संवर्धन केंद्रास भेट दिली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
यावेळी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय गडचिरोलीचे सु. वा. जांभुळे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर आदी उपस्थित होते. जिल्ह्यात असणाऱ्या बारमाही नद्या आणि साधारण ५ हजार तलावांच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर मत्स्यव्यवसाय वृध्दी शक्य आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मत्स्य विज्ञान केंद्राची संकल्पना मांडण्यात आली आहे. याला केंद्रस्थानी ठेवून मत्स्य विद्यापीठ नागपूर अंतर्गत एक उपकेंद्र स्थापन करण्यात यावे, असा प्रस्ताव नुकताच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. उपकेंद्राच्या कामाचे स्वरुप संशोधन आणि मत्स्यव्यवसाय संवर्धनास मार्गदर्शन अशा स्वरुपाचे असावे, असे अपेक्षित आहे. चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यात सर्वांनाच यामुळे मार्गदर्शन उपलब्ध होऊ शकेल असे प्रस्तावीत करण्यात येत आहे.
सध्या जिल्ह्यात २ हजार ८०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन होते असा प्राथमिक अंदाज आहे. मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने प्रत्यक्षात हे उत्पादन कमी पडते. त्यामुळे बाहेरील जिल्ह्यातून मासे आयात होत आहे. माजी मालगुजारी तलावाच्या माध्यमातून मासेमारी सहकारी संस्था आणि ग्रामपंचायती यांच्या माध्यमातुन यात विस्तार शक्य आहे. असे झाल्यास मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊन उत्पादनात वाढ होऊ शकते. याचा फायदा ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठया प्रमाणावर होणार आहे. जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळे या दोन योजनांमधून वैयक्तिक शेततळ्यांची संख्या वाढत आहे. याचा वापर मत्स्य व्यवसायासाठी झाला तर शेतकऱ्यांनाही धानाच्या जोडीला उत्पादनाचे पुरक साधन उपलब्ध होऊन त्यांचेही उत्पन्न वाढेल. जिल्ह्यात दरडोई उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट गाठण्यात मत्स्य व्यवसायाची मोठया प्रमाणावर मदत होणार आहे. मुरखळा येथील मत्स्य संवर्धन केंद्रात मत्स्य बिजातून आलेले लहान मासे आणून त्यांना तीन ते सहा आठवडे कालावधीत विकसित करुन मागणी करणाऱ्या संस्थाना उपलब्ध करुन दिले जातात. यंदाच्या हंगामात २५ लाख इतक्या मोठ्या संख्येत छोटी मासोळी येथील सात तलावात संवर्धनासाठी टाकण्यात आली असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय अधिकारी जांभूळे यांनी यावेळी दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारामुळे जिल्ह्यात आता मत्स्य व्यवसायास चालना मिळणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाचे पाऊल पडत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)