जिल्हा परिषदेला पहिल्यांदाच मिळाला ५०५४ हेडचा निधी
By Admin | Updated: April 2, 2016 01:44 IST2016-04-02T01:44:47+5:302016-04-02T01:44:47+5:30
रस्ते दुरूस्तीसाठी ५०५४ या हेडखाली सार्वजनिक बांधकाम विभागाला मिळणाऱ्या निधीतील काही हिस्सा जिल्हा परिषदेला देण्यात यावा,

जिल्हा परिषदेला पहिल्यांदाच मिळाला ५०५४ हेडचा निधी
बांधकाम सभापतींचा पाठपुरावा : ३ कोटी ५० लाखांचा निधी प्राप्त
गडचिरोली : रस्ते दुरूस्तीसाठी ५०५४ या हेडखाली सार्वजनिक बांधकाम विभागाला मिळणाऱ्या निधीतील काही हिस्सा जिल्हा परिषदेला देण्यात यावा, याबाबतची मागणी जिल्हा परिषदेचे बांधकाम व वित्त सभापती अतुल गण्यारपवार यांनी राज्य शासनाकडे केली होती. त्यानुसार शासनाने जिल्हा परिषदेला निधी वितरणाचा आदेश ३१ मार्च रोजी निर्गमित केला असून ५०५४ या हेडखाली गडचिरोली जिल्हा परिषदेला पहिल्यांदाच ३ कोटी ५० लाख ६४ हजार रूपयांचा निधी मिळाला आहे.
जिल्हा परिषदेच्या मार्फतीने जिल्ह्यातील ओडीआर (अदर डिस्ट्रिक रोड) व व्हीआर (व्हिलेज रोड) ची दुरूस्ती तसेच बांधकाम केले जाते. मात्र रस्त्यांच्या तुलनेत जिल्हा परिषदेला अत्यंत कमी निधी प्राप्त होत होता. त्यामुळे ओडीआरचे रस्ते कार्यक्षेत्रात येऊनही त्यांच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यावर मर्यादा येत होत्या. ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार बांधकाम विभागाला मिळणाऱ्या एकूण निधीतून काही निधी जिल्हा परिषदेला देण्याची तरतूद आहे. मात्र याची अंमलबजावणी केली जात नव्हती.
५०५४ अंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतील काही निधी जिल्हा परिषदेला देण्यात यावा, यासाठी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार यांनी आवश्यक ते शासन निर्णय जोडून जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने सदर प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला. राज्य शासनाने या प्रस्तावाची दखल घेत २०१५-१६ च्या पुनर्विनियोजन निधीमधील ३ कोटी ५० लाख ६४ हजार रूपयांचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त करून दिला आहे. त्याबाबतचे पत्र जिल्हा परिषदेला ३१ मार्च रोजी प्राप्त झाले आहे.
या निधीमुळे जिल्ह्यातील दुर्गम तसेच ग्रामीण भागातील रस्ते विकासाला गती मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (नगर प्रतिनिधी)
राज्यातील इतरही जिल्हा परिषदांना होणार फायदा
५०५४ अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त होणाऱ्या निधीपैकी काही निधी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला देण्याची तरतूद असली तरी राज्यभरातील जिल्हा परिषदा याबाबत अनभिज्ञ होत्या. त्यामुळे हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागच आजपर्यंत वापरत होता. मात्र गडचिरोली जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे सभापती अतुल गण्यारपवार व प्रशासकीय यंत्रणेने यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर पहिल्यांदाच हा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. त्यामुळे राज्यभरातील इतरही जिल्हा परिषदा आता या निधीची मागणी राज्य शासनाकडे करणार आहेत.
५०५४ या हेडखाली सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त होणाऱ्या निधीपैकी काही निधी जिल्हा परिषदेला देण्याची तरतूद आहे. यासाठी जि. प. बांधकाम विभागाने प्रस्ताव तयार केला व या प्रस्तावाचा आपण सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे ५०५४ चा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. या निधीमुळे दुर्गम व ग्रामीण भागातील रस्ते विकासाला गती प्राप्त होणार आहे.
- अतुल गण्यारपवार, सभापती जि. प. बांधकाम,
वित्त व नियोजन विभाग, गडचिरोली
५० कोटींच्या निधीची मागणी
जिल्हा परिषदेला सध्या प्राप्त झालेला ३ कोटी ५० लाख ६४ हजार रूपयांचा निधी हा पुनर्विनियोजनातील आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेने २०१५-१६ या वर्षात २० कोटी रूपये व २०१६-१७ मध्ये ३० कोटी रूपयांचा निधी जिल्हा परिषदेला देण्यात यावा, यासाठी नियोजन केले असून तशा प्रकारचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. हा निधी प्राप्त झाल्यास रस्ते विकासाला गती मिळेल.
५०५४ अंतर्गत प्राप्त होणारा निधी हा जिल्हा परिषदेच्या हक्काचा निधी आहे. त्यामुळे तो मिळावा, यासाठी जि. प. बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार यांनी प्रस्ताव तयार केला व शासनाकडे पाठविला. दोन महिन्यांपूर्वी डीपीडीसीची बैठक पार पडली. या बैठकीतही सभापती अतुल गण्यारपवार यांच्यासह जि. प. सदस्य केसरी उसेंडी, मनोहर पोरेटी, पद्ममाकर मानकर, शांता परसे, प्रतिभा गद्देवार यांनीही आवाज उठविला होता. हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यासाठी जिल्हाधिकारी रणजीतकुमार, मुख्य कार्यपालन अधिकारी संपदा मेहता, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जवळेकर व कार्यकारी अभियंता पेंदोर यांनीही महत्त्वाची भूमिका निभाविली.