त्यांनी पहिल्यांदाच पाहिले रेल्वे आणि विमान

By Admin | Updated: September 4, 2015 01:19 IST2015-09-04T01:19:50+5:302015-09-04T01:19:50+5:30

आमच्या गावाकडे घनदाट जंगल. जंगलातूनच मैलो न मैल पायपीट. दिसलीच तर एखादी काळी-पिवळी टॅक्सी.. फार तर महामंडळाची एसटी.. एवढेच.

The first time they saw trains and aircraft | त्यांनी पहिल्यांदाच पाहिले रेल्वे आणि विमान

त्यांनी पहिल्यांदाच पाहिले रेल्वे आणि विमान

महाराष्ट्र दर्शन सहल : नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांनी कथन केले अनुभव
गडचिरोली : आमच्या गावाकडे घनदाट जंगल. जंगलातूनच मैलो न मैल पायपीट. दिसलीच तर एखादी काळी-पिवळी टॅक्सी.. फार तर महामंडळाची एसटी.. एवढेच. त्यामुळे हीच वाहतुकीची साधने आहेत, असा आमचा समज. मात्र यापलीकडेही वाहतुकीसाठी जलद साधने आहेत, ते आम्ही केवळ पुस्तकात छायाचित्रांच्या
स्वरुपात पाहिले होते. ही साधने कशी असतात, आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळणार का, अशी कल्पनासुध्दा केली नव्हती. मात्र पोलिसांच्या महाराष्ट्र दर्शन सहलीचा योग आला आणि आम्ही पहिल्यांदाच रेल्वे आणि विमान कसे असते, ते याची डोळा पाहिले. नव्हे तर रेल्वेचा प्रवास देखील अनुभवला, असे अनुभव नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांनी नागपूर भेटीदरम्यान सांगितले.
आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती सहल योजनेच्या माध्यमातून गडचिरोली पोलिसांनी नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचे दर्शन घडविले. या सहलीत गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील ४१ मुले व ४० मुली असे एकूण ८१ विद्यार्थी सहभागी झाले होते. यात नक्षलपिडीत कुटुंबातील आणि नक्षल सदस्य असलेल्या कुटुंबातील प्रत्येकी ५ विद्यार्थ्यांचा समावेश होता. राज्यातील मुंबई, पुणे, औरंगाबाद आदी शहरांना भेटी देऊन विद्यार्थ्यांची ही सहल नागपूरात दाखल झाली. सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी दोन दिवसांत शहरातील डॉ. रमन विज्ञान केंद्र, दीक्षाभूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, वस्तु संग्रहालय, आकाशवाणी केंद्र, महाराज बाग, वॉटर पार्क या ठिकाणी भेट देऊन शहरातील झालेल्या प्रगतीची माहिती जाणून घेतली. या संपूर्ण सहलीत विद्यार्थ्यांना मनोरंजनाच्या माध्यमातून विकासाचीसुध्दा माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे मुंबईचे विमानतळ पाहण्याची संधी हुकल्यामुळे नागपूरातील विमानतळाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जास्तच उत्सुकता होती. विमान कसे असते, आकाशात ते कसे उडाण घेते आदी गोष्टी त्यांनी नागपूरात अनुभवल्या.
जिल्ह्याच्या बाहेर पहिल्यांदाच पाऊल ठेवले आहे. महाराष्ट्र दर्शन सहलीचा बहुतांश प्रवास रेल्वेने केला. यापूर्वी आम्ही कधी रेल्वेत बसलो नव्हतो. मात्र पोलिसांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली. या सहलीच्या माध्यमातून महाराष्ट्राचा शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक असा विकास अनुभवला. या बाबींचा आमच्या भविष्यात नक्कीच उपयोग होईल, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. दलम कमांडरची मुलगी असलेल्या १६ वर्षीय मुलीने आपल्या वडीलांनी नक्षल चळवळ सोडून पोलिसांसमोर आत्मसमर्पण करावे, असे सांगितले. तसेच अशा सहलीच्या माध्यमातूनच गडचिरोलीचे विद्यार्थी विकासाच्या प्रवाहात येतील. त्यामुळे पोलिसांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहलीचा अनुभव द्यावा, असेही ती म्हणाली.
नागपूर येथील सहलीच्या यशासाठी नक्षल विरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक तथा सहपोलिस आयुक्त राजवर्धन व गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या महाराष्ट्र दर्शन सहलीचा बुधवारी गडचिरोलीत समारोप झाला. यावेळी जिल्हाधिकारी रणजीतकुमार, पोलीस अधीक्षक संदीप पाटील उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: The first time they saw trains and aircraft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.