पहिल्या हप्त्यातच अडकले घरकूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 23:48 IST2018-02-11T23:48:09+5:302018-02-11T23:48:32+5:30
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २०१७-१८ या वर्षात सुमारे ३ हजार १२३ घरकूल मंजूर केले आहेत. मात्र यातील केवळ १ हजार ७०० लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याची रक्कम उपलब्ध झाली आहे.

पहिल्या हप्त्यातच अडकले घरकूल
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २०१७-१८ या वर्षात सुमारे ३ हजार १२३ घरकूल मंजूर केले आहेत. मात्र यातील केवळ १ हजार ७०० लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याची रक्कम उपलब्ध झाली आहे. तर उर्वरित १ हजार ४२३ लाभार्थ्यांना अजुनही पहिला हप्ता सुद्धा प्राप्त झाला नाही. त्यामुळे या घरांच्या कामाला सुरूवातच झाली नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
कच्चा घर असलेल्या प्रत्येक कुटुंबाला पक्के घर उपलब्ध व्हावे या उद्देशाने केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे. या योजनेतंर्गत प्रत्येक लाभार्थ्याला घरकूल बांधण्यासाठी सुमारे १ लाख ५० हजार अनुदान दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून गरीब नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण होत असल्याने या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरीब नागरिक मोठ्या प्रमाणात इच्छूक राहतात. २०१७-१८ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात ३ हजार १२३ घरकूल मंजूर केले होते. घरकूल मंजूर झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्याला आवश्यक असलेली कागदपत्रे जोडावी लागतात. यामध्ये घराच्या जमिनीबाबतचे दस्तावेज, बँक खाते, करारनामा आदी कागदपत्रे जोडावी लागतात. स्वत:चे कामकाज सांभाळतानाच कागदपत्रेही गोळा करावी लागतात. ही कागदपत्रे सादर करण्यास बराच उशीर होतो. कागदपत्रे सादर करण्यास उशीर होत असल्याने घरकुलाचा पहिला हप्ता मिळण्यासही बिलंब होतो. गडचिरोली जिल्ह्यात जुने ते नोव्हेंबर या महिन्यात येथील शेतकरी व शेतमजूर शेतीची कामे करण्यातच व्यस्त राहतो. या कालाधीत तो कोणतीच कागदपत्रे सादर करीत नाही. पावसाळ्यात घर बांधणे शक्य होत नसल्यानेही शेतकरी कागदपत्रे गोळा करण्याकडे फारसे लक्ष देत नाही. शेतीची कामे संपल्यानंतर जवळपास डिसेंबर महिन्यापासून आता कागदपत्रे गोळा करण्यास सुरूवात झाली आहे. ५ फेब्रुवारीपर्यंत एकूण मंजूर घरकुलांपैकी फक्त १ हजार ७०० घरकुल लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याची रक्कम वितरीत करण्यात आली आहे. एकूण मंजूर घरकुलांपैकी केवळ ६०.६५ टक्के लाभार्थ्यांना घरकूलाची रक्कम देण्यात आली आहे.
शेतीची कामे आता संपत आली असल्याने लाभार्थी कागदपत्रे गोळा करण्यास धावपळ करीत असून आर्थिक वर्ष संपण्याच्या पूर्वी सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या हप्त्याची रक्कम जमा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मागील वर्षीचे केवळ ७४५ घरकूल पूर्ण
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मागील वर्षी गडचिरोली जिल्हह्यात एकूण ५ हजार ८०६ घरकूल मंजूर केले होते. त्यापैकी ५ हजार ५९८ लाभार्थ्यांना पहिला हप्ता मंजूर करण्यात आला आहे. २ हजार १०६ लाभार्थ्यांनी दुसरा हप्ता उचलला आहे. तीसरा हप्ता उचलून घराचे बांधकाम पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांची संख्या ७४५ एवढी आहे. एकूण मंजूर घरकुलांच्या केवळ १० टक्के घकुलांचे काम पूर्ण झाले आहे. २०८ घरकुल लाभार्थ्यांनी पहिल्या हप्त्याचीही उचल केली नाही. त्यामुळे या लाभार्थ्यानी घराच्या कामाला अजूनही सुरूवात केली नसल्याचे स्पष्ट होत आहे.