बंगाडी गावात सुरू झाला पहिल्यांदाच हातपंप
By Admin | Updated: May 1, 2016 01:20 IST2016-05-01T01:20:14+5:302016-05-01T01:20:14+5:30
येथून १० किमी अंतरावर असलेल्या बंगाडी या गावात पहिल्यांदाच हातपंप खोदण्यात आले आहे.

बंगाडी गावात सुरू झाला पहिल्यांदाच हातपंप
सुविधांचा अभाव :लोकमतने वेधले होते प्रशासनाचे लक्ष
लाहेरी : येथून १० किमी अंतरावर असलेल्या बंगाडी या गावात पहिल्यांदाच हातपंप खोदण्यात आले आहे. यामुळे या गावची पाणीटंचाईची समस्या थोड्याफार प्रमाणात कमी झाली आहे. या गावातील समस्यांबाबत दोन महिन्यांपूर्वी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
बंगाडी हे गाव लाहेरी ग्रामपंचायतीअंतगत येते. सुमारे ३०० लोकसंख्या असलेल्या या गावामध्ये एकही हातपंप नव्हते. त्यामुळे गावातील नागरिक जवळपास नाल्याचे पाणी आणून तहान भागवत होते. उन्हाळ्यामध्ये या गावात पाणीटंचाईची समस्या आणखी गंभीर होत होती. लाहेरीचे माजी सरपंच सुरेश सिडाम, ग्रामसेवक, गावातील नागरिक विश्वनाथ आत्राम, बाल्या बोगामी यांच्या पुढाकाराने या गावामध्ये हातपंप मंजूर करण्यात आले व मागील महिन्यात खोदकाम करण्यात आले. हातपंपाला पुरेसे पाणी लागले आहे. मात्र गावाची लोकसंख्या लक्षात घेता एक हातपंप पुरेसे नाही, एक नवीन विहीर खोदून देण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.राज्याच्या सीमेवर असलेले बंगाडी हे गाव सोयीसुविधांपासून पूर्णपणे वंचित आहे. या गावाला जाण्यासाठी रस्ता नाही. अजूनपर्यंत या गावाला वीज पोहोचली नाही.