प्रथमोपचार पेट्या गायब
By Admin | Updated: October 27, 2014 22:36 IST2014-10-27T22:36:47+5:302014-10-27T22:36:47+5:30
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एसटी महामंडळातर्फे प्रत्येक बसमध्ये आग प्रतिबंधक उपकरणे, प्रथमोपचार पेटी व क्वाईन बॉक्स काही दिवसांपूर्वी बसविण्यात आले होते. परंतु सद्यस्थितीत

प्रथमोपचार पेट्या गायब
गडचिरोली : प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एसटी महामंडळातर्फे प्रत्येक बसमध्ये आग प्रतिबंधक उपकरणे, प्रथमोपचार पेटी व क्वाईन बॉक्स काही दिवसांपूर्वी बसविण्यात आले होते. परंतु सद्यस्थितीत बहुतांश एसटीमधून सदर उपकरणे दिसेनाशी झाली आहेत. त्यामुळे आकस्मिक संकटाच्या वेळी मोठा धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक बसमधील आग प्रतिबंधक उपकरणे, प्रथमोपचार पेट्या गायब झाल्या आहेत.
आग प्रतिबंधक उपकरणे बसविणे हे परिवहन कायद्यानुसार बंधनकारक आहे. मात्र महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून संबंधीत कायद्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. एसटी महामंडळाने सुरक्षित प्रवासाची जणू हमीच घेतली, अशा आविर्भावात प्रवाशांच्या सुरक्षेचा उदो उदो प्रारंभी केला जात होता. मात्र महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गलथान व उदासीन कारभारामुळे प्रवाशांची असुरक्षितता वाढली आहे. परिणामत: अनेक प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळले आहेत. दुर्दैवाने बसमधून प्रवास करतांना अपघात झालाच तर प्राथमिक उपचार म्हणून कशाचा वापर करायचा असा प्रश्न प्रवाशांसमोर निर्माण झाला आहे. अपघात प्रवाशी किरकोळ जखमी झाल्यावर जागीच प्राथमिक उपचार व्हावा, याकरिता डेटॉल, ड्रेसिंग आदी साहित्य असलेली पेटी बसगाडीत पूर्वी असायची. याबाबत परिवहन विभागाकडून राज्यातील सर्व आगारांना स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात चालणाऱ्या कोणत्याही एसटी बसमध्ये प्रथमोपचार पेटी तर दिसतच नाही. शिवाय आग प्रतिबंधक यंत्रणाही गायब झाल्याचे दिसून येत आहे.
गडचिरोली आगारातून सिरोंचा, भामरागड, कोरची, धानोरा यासारख्या दुर्गम भागात अनेक बसफेऱ्या होतात. या बसगाड्या जिल्ह्यात व जिल्हाबाहेरही प्रवाशांची ने-आण करतात. गडचिरोली आगारातील एसटी गाड्यांच्या देखभालीसाठी एक मुख्य वर्कशॉप आहे. एसटीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी एसटीचे विभागीय कार्यलय आहे. सुरक्षित प्रवास म्हणून प्रवाशी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीला प्रथम पसंती देतात. प्रवाशांच्या सोयीनुसान नवनवीन गाड्या आणल्या जातात. प्रवासाला जाणाऱ्या प्रत्येक गाडीची पाहणी केली जाते. अशावेळी गाडीत प्रथमोपचार, अग्नीशमन यंत्रणा व त्यातील साहित्य आहेत की नाही याची पाहणी संबंधित अधिकाऱ्यांकडून का होत नाही, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे. बहुतांश एसटीतील क्वाईन बॉक्सही बेपत्ता झाले आहेत.
आग प्रतिबंधक उपकरणे अनेक बसमध्ये लावण्यातही आले नव्हते. त्यामुळे सध्य:स्थितीतही अनेक बसेस साहित्यविनाच आहेत. विशेष सदर उपकरणे असल्याशिवाय आरटीओ कार्यालयाकडून वाहनांची पासिंग केली जात नाही. असे असताना वाहनांची पासिंग कशी काय केली जात आहे, हाही प्रश्न आहे. बसगाड्यांमधील प्रथमोपचार पेट्या व इतर साहित्य अनेक दिवसांपासून बेपत्ता आहेत. (शहर प्रतिनिधी)