अन् अग्निशामक वाहन पोहोचले उशिरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:38 IST2021-03-27T04:38:04+5:302021-03-27T04:38:04+5:30
कोरची येथील शिक्षक कॉलनीत भाड्याने राहणाऱ्या महेंद्र बारसिंगे यांच्या घरी मंगळवारी सायंकाळी ७ वाजता शॉर्टसर्किटमुळे अचानक किचनमध्ये असलेल्या फ्रीजने ...

अन् अग्निशामक वाहन पोहोचले उशिरा
कोरची येथील शिक्षक कॉलनीत भाड्याने राहणाऱ्या महेंद्र बारसिंगे यांच्या घरी मंगळवारी सायंकाळी ७ वाजता शॉर्टसर्किटमुळे अचानक किचनमध्ये असलेल्या फ्रीजने पेट घेतला. घरात सर्वत्र धूर पसरत होता. ज्यामुळे धावपळ सुरू झाली. लगेच नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाला दूरध्वनीद्वारे संपर्क केला असता, त्यांचे वाहन कोरची शहरातच पोहोचण्यास अर्धा तास उशीर झाला. तेव्हा परिसरातील नागरिकांनी स्वतःच ती आग आटोक्यात आणली. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये अग्निशामक वाहन हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांविषयी नाराजीचा सूर उमटला. विशेष म्हणजे, पेट घेतलेल्या फ्रीजच्या बाजूलाच गॅस सिलिंडर होते. तसेच काॅलनीत ४ कुटुंब वास्तव्यास आहेत. आगीने राैद्ररूप धारण केले असते, तर मोठी दुर्घटना घडली असती. दाेन वर्षांपूर्वी कोरची येथे अशाच आगीने पूर्ण चाळ भस्मसात झाली होती. हा धाेका ओळखूनच नगरपंचायतीने अग्निशामक वाहन खरेदी केले हाेते, परंतु हे वाहन आग विझविण्याच्या कामात आणले जात नसून, दुसऱ्याच कामासाठी वापरले जात आहे. कोरची शहरासाठी खरेदी करण्यात आलेल्या अग्निशामक वाहनाचा उपयोग जर वेळेवर होत नसेल, तर हे शहरासाठी माेठे दुर्दैव असून, शहरात परत मोठी घटना घडू नये, यासाठी नगरपंचायतीने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी माजी नगरसेवक मनोज अग्रवाल यांनी केली आहे.