अखेर चिंतलपेठ येथे शौचालय बांधकामाला मंजुरी
By Admin | Updated: June 28, 2015 02:07 IST2015-06-28T02:07:27+5:302015-06-28T02:07:27+5:30
तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावरील चिंतलपेठ गावात २२ जून रोजी सोमवारी शौचालयाच्या खड्ड्यात पडून नयन प्रविण दुर्गे या चार वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू झाला.

अखेर चिंतलपेठ येथे शौचालय बांधकामाला मंजुरी
पंचायत समिती प्रशासन लागले कामाला : ई-मस्टर काढण्याचे काम युध्दपातळीवर
अहेरी : तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावरील चिंतलपेठ गावात २२ जून रोजी सोमवारी शौचालयाच्या खड्ड्यात पडून नयन प्रविण दुर्गे या चार वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू झाला. दरम्यान गावातील नागरिकांनी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. त्यानंतर पंचायत समिती प्रशासनाने गतीने हालचाली वाढवून २४ जूनला बुधवारी चिंतलपेठ येथील शौचालयाला मनरेगा योजनेंतर्गत मंजुरी प्रदान केली आहे.
पंचायत समितीतील अधिकाऱ्यांच्या समुपदेशनामुळे बांधकाम झाल्यानंतर शासनाच्या योजनेतून शौचालय बांधकामाला अनुदान मिळेल, या आशेवर चिंतलपेठ गावातील तब्बल ८२ कुटुंबांनी शौचालय बांधकामासाठी खड्ड्याचे खोदकाम सुरू केले. खोदकाम पूर्ण झाल्यानंतरही शासनाकडून पहिल्या टप्प्यातील अनुदान नागरिकांना मिळाले नाही. दरम्यान शासनाच्या शौचालय बांधकामासंदर्भातील स्वच्छ भारत अभियानांतर्गत निर्मल भारत व मनरेगा या दोन योजना वेगळ्या झाल्या.
त्यामुळे शौचालय बांधकामासाठी खोदलेले खड्डे अनुदानाअभावी तसेच कायम राहिले. त्यामुळे चिंतलपेठ गावात चार वर्षीय बालकाचा खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर पंचायत समिती प्रशासन शौचालय योजनेच्या कामाला लागले. शौचालय बांधकामाला प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर ई-मस्टर काढण्याचे काम पं.स. मार्फत युध्दपातळीवर सुरू आहे. येत्या आठ दिवसात शौचालय बांधकामाकरिता लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यातील अनुदानाची रक्कम अग्रीम म्हणून देण्यात येणार असल्याचे आश्वासन अहेरी पंचायती समितीचे संवर्ग विकास अधिकारी बादलशहा मडावी यांनी ग्रामस्थांना दिले आहे. (प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांच्या समुपदेशनाने नयनचा घात
अहेरी पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने चिंतलपेठ या गावात नरेगा अंतर्गत शौचालय बांधकाम मंजूर केले नाही. दरम्यान पं.स.च्या काही अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तोंडी सूचनेनुसार चिंतलपेठ गावात हागणदारी मुक्तीची संकल्पना मांडली व गावकऱ्यांना शौचालय बांधकामासाठी प्रवृत्त केले. त्यानुसार या गावात शौचालय बांधकामासाठी तब्बल ८२ खड्डे खोदण्यात आले. पाऊस झाल्यानंतर शौचालयाच्या खड्ड्यात पाणी साचले. दरम्यान शौचालयाच्या खड्ड्यात पडून नयन दुर्गे या बालकाचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी घाईने केलेल्या समुपदेशनाने नयनचा घात झाला, अशी भावना गावकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.