अखेर गुंडापल्लीच्या पोलीस पाटलाचे लग्न रद्द
By Admin | Updated: June 18, 2016 00:49 IST2016-06-18T00:49:51+5:302016-06-18T00:49:51+5:30
२००२ पासून सतत १४ वर्षे महिलेशी अवैध शारीरिक संबंध ठेवून ११ वर्षांचा मुलगा असतानाही ऐनवेळी लग्नास नकार देऊन १७ जून रोजी अन्य मुलीशी लग्न करण्याचा प्रयत्न ...

अखेर गुंडापल्लीच्या पोलीस पाटलाचे लग्न रद्द
उपवधूनेही दिला नकार : किशोर सिडामवर आष्टी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल
आष्टी : २००२ पासून सतत १४ वर्षे महिलेशी अवैध शारीरिक संबंध ठेवून ११ वर्षांचा मुलगा असतानाही ऐनवेळी लग्नास नकार देऊन १७ जून रोजी अन्य मुलीशी लग्न करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंडापल्ली येथील पोलीस पाटील किशोर सिडाम याचे लग्न अखेर उपवधूच्या नकाराने रद्द झाले. पीडित महिलेच्या तक्रारीवरून किशोर सिडाम याच्या विरोधात कलम ३७६ अन्वये आष्टी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिरोंचा तालुक्याच्या कंबालपेठा येथील पीडित महिलेने आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून गुंडापल्लीचे पोलीस पाटील किशोर सिडाम यांचे १७ जून रोजी लग्न लागल्यास आपण मुलासह विवाहस्थळी आत्मदहन करणार, असा इशारा १६ जून रोजी दिला होता. यासंदर्भात पीडित महिलेने पत्रकार परिषदही आष्टी येथे घेतली होती. पोलिसात दिलेल्या तक्रारीनंतर व आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर सतर्क झालेल्या पोलिसांनी गुरूवारी रात्री ११ ते १२ वाजताच्या सुमारास थेट गुंडापल्ली गाठून किशोर सिडाम याला समजूत घातली व लगाम येथील मुलीशी शुक्रवारी होणारे लग्न रद्द करण्यासंदर्भात सांगितले. तसेच होणाऱ्या परिणामासंदर्भातही चेतावनी दिली. त्यामुळे किशोर सिडाम याने शुक्रवारी आपल्या लग्नाची वरात काढली नाही. तसेच किशोर सिडाम याच्याशी लग्न जुळलेल्या मुलचेरा तालुक्यातील लगाम येथील युवतीनेही लग्नाला स्पष्ट नकार दिल्याची माहिती आहे. त्यामुळे अखेर शुक्रवार १७ जून रोजी होणारा विवाह रद्द करण्यात आला. विशेष म्हणजे, पीडित महिला व किशोर सिडाम यांच्या प्रेमसंबंधातून २००६ मध्ये त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले होते. (वार्ताहर)
प्रकरण बामणी पोलिसांकडे सुपूर्द
पीडित महिला सिरोंचा तालुक्याच्या कंबालपेठा येथील रहिवासी आहे. सदर गाव बामणी पोलीस ठाण्यांतर्गत येत असल्यामुळे या प्रकरणाचा तपास बामणी पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आला. मात्र किशोर सिडाम याच्या विरोधात कलम ३७६ अंतर्गत आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. त्यामुळे या प्रकरणाच्या संपूर्ण तपासाची जबाबदारी बामणी पोलिसांकडे आलेली आहे. पीडित महिला व प्रेम संबंधातून जन्माला आलेल्या ११ वर्षीय बालकाची जबाबदारी किशोर सिडाम घेणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आष्टीत १० जणांनी ठोकला होता तळ
कंबालपेठा येथील पीडित महिलेच्या नातेवाईकासह कंबालपेठा येथील तंमुस अध्यक्ष, पोलीस पाटील व पदाधिकाऱ्यांसह एकूण ८ ते १० जणांनी आष्टी येथे दोन दिवसांपासून तळ ठोकला होता. किशोर सिडाम याचे १७ जून रोजी होणारे लग्न रद्द व्हावे, असा पवित्रा पीडित महिलेसह पदाधिकाऱ्यांनी घेतला होता. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले.