धोकादायक इमारतीत भरतो वर्ग
By Admin | Updated: July 25, 2016 01:40 IST2016-07-25T01:40:23+5:302016-07-25T01:40:23+5:30
तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील एक वर्ग जुन्या जीर्ण झालेल्या इमारतीत भरवला जात आहे.

धोकादायक इमारतीत भरतो वर्ग
निर्लेखित करा : शिवणी बूजची शाळा जीर्ण
आरमोरी : तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील एक वर्ग जुन्या जीर्ण झालेल्या इमारतीत भरवला जात आहे. सदर इमारत कधीही कोसळून विद्यार्थ्यांना धोका होण्याची शक्यता आहे. इमारत निर्लेखीत करण्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
शिवणी बूज येथील शाळेत एक ते आठपर्यंत वर्ग असून २२६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेत एकूण सात वर्गखोल्या आहेत. यापूर्वी या ठिकाणी एक ते सातपर्यंत शाळा होती. मात्र मागील वर्षीपासून या ठिकाणी आठवा वर्ग सुरू करण्यात आला आहे. या वर्गाला वर्गखोलीच नाही. त्यामुळे सदर वर्ग जुन्या इमारतीत भरवला जात आहे. जुनी इमारत कौलारू असून या इमारतीतील भिंतींना भेगा पडल्या आहेत व कवेलुसुध्दा फुटले आहेत. त्यामुळे पावसादरम्यान विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्गात बसवावे लागते. सदर इमारत निर्लेखीत करण्यासाठी दोन वर्षापूर्वीच शाळा व्यवस्थापन समितीने ठराव पंचायत समितीला सादर केला. मात्र यावर अजुनही कार्यवाही झाली नाही. यावर्षीच्या पावसाळ्यात तलाठी रोहिणी कांबळे यांनी पंचनामासुध्दा केला. नवीन इमारत बांधून द्यावी, अशी मागणी सरपंच राजेश्वर ठाकरे, उपसरपंच पुरूषोत्तम ठाकरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष देविदास बांडे, पो.पा. शकुंतला पत्रे, तंमुस अध्यक्ष विलास चौधरी यांनी केली आहे. (वार्ताहर)