'त्या' जुआरे परिवारावर विविध गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:23 IST2021-06-30T04:23:46+5:302021-06-30T04:23:46+5:30
प्रतिबंधित सुगंधित तंबाखूच्या विक्रीची कारवाई, कोविड साथीत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन, विलगीकरण कक्षामधून पळून जाणे, अशा वेगवेगळ्या कारणांसाठी पोलीस ...

'त्या' जुआरे परिवारावर विविध गुन्हे दाखल
प्रतिबंधित सुगंधित तंबाखूच्या विक्रीची कारवाई, कोविड साथीत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन, विलगीकरण कक्षामधून पळून जाणे, अशा वेगवेगळ्या कारणांसाठी पोलीस स्टेशनमध्ये जुआरे कुटुंबातील सदस्यांवर गुन्हे दाखल आहेत. मिळालेल्या माहितीवरून विनयकुमार जुआरे यांच्यावर ३, पत्नी पुष्पा जुआरे यांच्यावर २, यज्ञा जुआरे यांच्यावर २, रूपम जुआरेवर २ तर नेहा जुआरेवर १ असे एकूण १० गुन्हे दाखल आहेत. मात्र, ‘चोराच्या उलट्या बोंबा’ याप्रमाणे जुआरे यांनीच कारवाई करणाऱ्यांचे दोष दाखवण्याचा प्रयत्न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
आत्मदहनाचा इशारा देणारे बहीण-भाऊ रूपम जुआरे व नेहा यांच्यावर शासकीय कामात अडथडा आणणे, पोलिसांना शिवीगाळ करणे, प्रतिबंधित सुगंधित तंबाखू विकणे याअंतर्गत गुन्हे दाखल आहेत. आपला व्यवसाय चालवा म्हणून खोट्या तक्रारी देऊन प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न जुआरे कुटुंबीयांकडून सुरू असल्याचे बोलले जाते.
(बॉक्स)
गुन्ह्याची जुनीच परंपरा
विनय जुआरे हे शासकीय सेवेत आहेत. त्यांच्यावर २००५ मध्ये शासकीय रकमेची अफरातफर केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यात त्यांना शिक्षाही झाली होती; पण वरिष्ठ न्यायालयाने ती शिक्षा रद्द केली. ऑगस्ट २०२० मध्ये कोविडचा प्रादुर्भाव असताना सुद्धा नगर परिषद व मुक्तीपथच्या कारवाईमध्ये स्वीट मार्ट दुकानामध्ये सुगंधित तंबाखू मजा, ईगल आढळून आले होते. त्यात पुष्पा जुआरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. ९ एप्रिल २०२१ रोजी पुराडा पोलीस स्टेशनमध्ये रूपम जुआरे व वडील विनय जुआरे यांच्यावर सुगंधित तंबाखूची वाहतूक केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. ३१ मे २०२१ ला वडील विनयकुमार जुआरे व मुलगी यज्ञा जुआरे यांना कुरखेडा पोलिसांनी सुगंधित तंबाखूची वाहतूक करताना पकडले होते.