जिल्ह्यात १४ उमेदवारी अर्ज दाखल
By Admin | Updated: September 27, 2014 01:42 IST2014-09-27T01:42:04+5:302014-09-27T01:42:04+5:30
गडचिरोली जिल्ह्याच्या तीन विधानसभा मतदार संघात शुक्रवारी १४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शन करून दाखल केले.

जिल्ह्यात १४ उमेदवारी अर्ज दाखल
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या तीन विधानसभा मतदार संघात शुक्रवारी १४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शन करून दाखल केले. आज उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या प्रमुख उमेदवारांमध्ये अहेरी विधानसभा क्षेत्रातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून धर्मरावबाबा आत्राम, आरमोरी विधानसभा क्षेत्रात भाराकाँकडून विद्यमान आमदार आनंदराव गेडाम, आरमोरी क्षेत्रातच शिवसेनेकडून माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
गडचिरोली विधानसभा मतदार संघात शुक्रवारी चार उमेदवारांचे चार अर्ज दाखल झाले. आरमोरी विधानसभा क्षेत्रात सात उमेदवारांचे नऊ अर्ज तर अहेरी विधानसभा क्षेत्रात तीन उमेदवारांचे सहा अर्ज दाखल करण्यात आले आहे. आरमोरी मतदार संघात आज बहुजन समाज पक्षाच्यावतीने नामदेव शिवराम कुमरे, भाजपच्यावतीने सयाम कुवर लोकेंद्र शहा राजे फस्तेमल शहा यांनी तर अपक्ष म्हणून मनेश्वर मारोती मडावी, जयनेंद्रसिंह बजरंगसिंह चंदेल, योगेश नामदेव गोनाडे, भाकपच्यावतीने हिरालाल येरमे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून भाजपच्यावतीने शंभुविधी देवीदास गेडाम, शिवसेनेच्यावतीने वासुदेव किसन शेडमाके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. हिंदुस्थान जनता पार्टीच्यावतीने मोरेश्वर रामचंद्र किलनाके व भारिप बहुजन महासंघाच्यावतीने पुरूषोत्तम श्रावण गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. अहेरी विधानसभा क्षेत्रात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून संतोष मलय्या आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी अर्ज दाखल केले. शिवसेनेकडून रामसाय पोचा मडावी यांनी अर्ज दाखल केला आहे. आजही अनेक उमेदवारांनी अर्जांची खरेदी केली. तसेच अर्ज भरण्यासाठी नोटरीकडे गर्दी दिसून येत होती. उद्या निवडणुकीच्या अर्ज भरण्याची प्रक्रिया समाप्त होणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)