दोन पॅनलमध्ये काट्याची लढत
By Admin | Updated: August 30, 2015 01:12 IST2015-08-30T01:12:34+5:302015-08-30T01:12:34+5:30
१४ सप्टेंबर २०१५ रोजी होऊ घातलेल्या चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून १९ जागांपैकी चार जागांवर उमेदवारांची अविरोध निवड झाली आहे.

दोन पॅनलमध्ये काट्याची लढत
चामोर्शी बाजार समिती निवडणूक : अतुल गण्यारपवार व भाजप समर्थित पॅनलमध्ये रस्सीखेच
चामोर्शी : १४ सप्टेंबर २०१५ रोजी होऊ घातलेल्या चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून १९ जागांपैकी चार जागांवर उमेदवारांची अविरोध निवड झाली आहे. आता १५ जागांसाठी ३६ उमेदवार रिंगणात उभे ठाकले आहे. यात बाजार समितीचे माजी सभापती अतुल गण्यारपवार हे सेवा सहकारी गटामधून तर माजी सभापती दिवाकर कोलेट्टीवार हे ग्रामपंचायत मतदार संघातून रिंगणात उतरले असल्याने निवडणुकीची चूरस प्रचंड वाढली आहे.
सेवा सहकारी मतदार संघातील सर्वसाधारण गटातून सात उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. त्यासाठी अतुल गण्यारपवार यांच्या शेतकरी सहकारी पॅनलचे अरूण बंडावार, अतुल गण्यारपवार, जानकीराम कुसनाके, परमानंद मलिक, सुधाकर निखाडे, गोसाई सातपुते, शंकर वंगावार हे उमेदवार मैदानात उतरले आहेत. शेतकरी सहकारी पॅनलच्या विरोधात भाजप समर्थित पॅनलचे बाबुराव बकाले, धर्मेंद्र दुबे, किरण कोवासे, तुकाराम तोरे, शिशीर पोद्दार, कैलाश सातपुते, फकीरा ठेंगणे हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. याशीवाय यशवंत देवतळे, देवराव सिडाम अपक्ष म्हणून आपले भाग्य अजमावित आहेत.
सेवा सहकारी संस्थेच्या मतदार संघातील महिला गटातून शेतकरी सहकारी पॅनलचे बैनाबाई मडावी, कौशल्या पोरटे तर भाजप समर्थीत पॅनलचे बेबीबाई भोयर व भानूमती रॉय उभ्या आहेत. इतर मागासवर्गीय गटासाठी शेतकरी सहकारी पॅनलचे विनायक आभारे तर भाजप समर्थित पॅनलचे सुधीर शिवणकर लढत आहेत.
भटक्या जमाती, विमुक्त जाती गटातून शेतकरी सहकारी पॅनलचे गणपती भेंडारे तर भाजपा समर्थित यशवंत कलसार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. अनिल केलावार हे अपक्ष उभे आहेत.
ग्रामपंचायत मतदार संघातील सर्वसाधारण गटातून शेतकरी सहकारी पॅनलचे रामचंद्र बामणकर, निकेश गद्देवार तर भाजप समर्थित पॅनलचे बंडू चिळंगे, शरदराव कोलेट्टीवार उभे ठाकले आहेत. याशिवाय विलास घोंगळे अपक्ष आहेत. आर्थिक दुर्बल गटातून शेतकरी सहकारी पॅनलचे सतिश रॉय तर भाजप समर्थित उमेश कुकडे उभे असून किशोर पोरटे अपक्ष आहेत. हमाल-मापारी व तोलारी मतदार संघातून शेतकरी सहकारी पॅनलचे विलास कुकडे तर त्यांच्या विरोधात अनिल नैताम तर संदीप राऊत उभे आहेत.
अतुल गण्यारपवारच्या शेतकरी सहकारी पॅनलचे पणन प्रक्रिया मतदार संघातून अमोल गण्यारपवार, ग्रामपंचायत मतदार संघातील अनुसूचित जाती/जमाती गटातून, बाजीराव गावडे अविरोध निवडून आल्यामुळे निवडणुकीपूर्वीच त्यांची सरशी झाल्याचे दिसते. याशिवाय व्यापारी व अडते मतदार संघातून चंद्रकांत दोषी व शामराव लटारे अविरोध निवडून आले असले तरी त्यांनी आपला कल व्यक्त केला नाही. निवडणूक निकालानंतर कोणत्या गटाला पाठींबा द्यायचा हे ते ठरविणार आहेत. चार जागी अविरोध निवड झाल्यामुळे होऊ घातलेल्या १५ जागांसाठी निवडणूक अटीतटीची होईल हे निश्चित. या निवडणुकीत सर्वच उमेदवारांनी विजयासाठी कंबर कसली असून मागील पाच वर्षाच्या काळात बाजार समितीत विकास कामे झालेत. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय झालेत, असा दावा करीत शेतकरी सहकारी पॅनल मैदानात आहे. (तालुका प्रतिनिधी)