तेलंगणाच्या बॅरेज कामाविरोधात आविसं उभारणार लढा
By Admin | Updated: January 21, 2016 00:18 IST2016-01-21T00:18:00+5:302016-01-21T00:18:00+5:30
तालुक्याला लागून असलेल्या तेलंगणा राज्याच्या सीमेवर मेडीगट्टा-कालेश्वर बॅरेजचे बांधकामाबाबत सर्वेक्षण कार्य वेगाने सुरू आहे. हे थांबविण्यात आलेले नाही.

तेलंगणाच्या बॅरेज कामाविरोधात आविसं उभारणार लढा
मागणी : महाराष्ट्र सरकारने भूमिका स्पष्ट करावी; ५ ला सिरोंचा तहसील कार्यालयावर नेणार मोर्चा
सिरोंचा : तालुक्याला लागून असलेल्या तेलंगणा राज्याच्या सीमेवर मेडीगट्टा-कालेश्वर बॅरेजचे बांधकामाबाबत सर्वेक्षण कार्य वेगाने सुरू आहे. हे थांबविण्यात आलेले नाही. या बॅरेज बांधकामाबाबत स्थानिक शेतकरी व नागरिकांना विश्वासात घेण्यात आले नाही. महाराष्ट्र सरकारने या कामाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी घेऊन आदिवासी विद्यार्थी संघाने १३ गावातील नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.
सिरोंचाचे तहसीलदार अशोक कुमरे यांना आदिवासी विद्यार्थी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी यासंदर्भात निवेदन दिले असून या निवेदनात तेलंगणा राज्यातील महादेवपूर व महाराष्ट्रातील सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली गावाजवळ गोदावरी नदीवर मेडीगट्टा-कालेश्वर या नावावर पाण्याच्या पाठवणुकीच्या उद्देशाने तेलंगणा सरकार बॅरेज बांधकाम करीत आहे. यासाठी सुरू असलेले सर्वेक्षण त्वरित थांबविण्यात यावे, तसेच तेलंगणा सरकार वर्धा, वैनगंगा, प्राणहिता या नद्यांच्या संगमावर तुमडी हेटीजवळ चव्हेला लिफ्ट एरिकेशन महाकाय योजनेचे काम सुरू आहे. हे काम पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे. सिरोंचा तालुक्यात येणाऱ्या प्राणहिता नदीला आता पाणीही राहिलेले नसून नदी पूर्णत: कोरडी झाली आहे.
पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न बिकट होण्याची समस्या निर्माण झाली आहे. चव्हेला धरणाचे काम तत्काळ थांबविण्यात यावे, सिरोंचा तालुक्यात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, प्रत्येक एकरामध्ये दोन क्विंटल धान खरेदी करण्याची शासनाची अट रद्द करून १५ क्विंटल धान खरेदी करण्यात यावे, सिरोंचा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा या मागण्यांसाठी ५ फेब्रुवारी रोजी सिरोंचा तहसीलदार कार्यालयावर माजी आ. दीपक आत्राम यांच्या नेतृत्वात आदिवासी विद्यार्थी संघ मोर्चा काढणार आहे, असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. तहसीलदारांना निवेदन देताना आदिवासी विद्यार्थी संघाचे बानय्या जनगम, रवी सल्लम, मंदा शंकर, श्यामराव बेज्जनवार, मारोती गणपूरपू, कुमरी सडवली, पानेम राजन्ना, रवी सुलतान, तिरूपती शंकर वैशाख, जनगम सडवेली, रामानंद मारगोणी, लक्ष्मण बोल्ले, कालिदास गोगुला, रवी बोगोनी, सत्यम लागा, नारायण मुट्टूमाडीगाला उपस्थित होते.