पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीस कारावास
By Admin | Updated: April 10, 2015 01:10 IST2015-04-10T01:10:46+5:302015-04-10T01:10:46+5:30
विभक्त राहत असलेल्या पत्नीस मारहाण करणाऱ्या पतीस जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्षांचा कारावास व पाच हजार रूपये दंड ठोठावला आहे.

पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीस कारावास
गडचिरोली : विभक्त राहत असलेल्या पत्नीस मारहाण करणाऱ्या पतीस जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्षांचा कारावास व पाच हजार रूपये दंड ठोठावला आहे.
सुरेश गुलाब वाणी (३५) रा. गोकुलनगर गडचिरोली असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सुरेश व त्याची पत्नी रत्नमाला यांच्या लग्नानंतर काही दिवसातच भांडण सुरू झाल्याने सुरेश व रत्नमाला हे दोघेही गोकुलनगर येथे विभक्त राहत होते. रत्नमालाने पोटगीबाबत न्यायालयात धाव घेतली. सुरेशने पोटगी न दिल्याने न्यायालयाने त्याला शिक्षा ठोठावली व तुरूंगात रवानगी केली. तुरूंगातून सुटून आल्यानंतर २४ जानेवारी २०१२ रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास रत्नमाला गोकुलनगर येथील घराकडे जात असताना सुरेशने तिच्या डोक्यावर लोखंडी सुऱ्याने वार केला. यात रत्नमाला ही जखमी झाली. तिने याबाबतची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिली. तीन वर्षानंतर या प्रकरणाचा निकाला लागला असून आरोपी सुरेश वाणी याला दोन वर्षाची शिक्षा व पाच हजार रूपये दंड ठोठावला आहे. सदर शिक्षा जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एम. दुनेदार यांनी ठोठावली. सरकारी वकील म्हणून अनिल प्रदान यांनी काम पाहिले. (नगर प्रतिनिधी)