तापाने विवाहित महिला दगावली
By Admin | Updated: October 1, 2015 01:39 IST2015-10-01T01:39:53+5:302015-10-01T01:39:53+5:30
गणेश चतुर्थीच्या पूर्वसंधेला सुरू होऊन सलग तीन दिवस आलेला पाऊस व नंतरच्या कडकडीत उन्हामुळे वातावरणात झालेला फेरबदल यामुळे सिरोंचा तालुक्यात तापाची साथ पसरली आहे.

तापाने विवाहित महिला दगावली
सिरोंचा तालुका : मुलगी अहेरीला दाखल
सिरोंचा : गणेश चतुर्थीच्या पूर्वसंधेला सुरू होऊन सलग तीन दिवस आलेला पाऊस व नंतरच्या कडकडीत उन्हामुळे वातावरणात झालेला फेरबदल यामुळे सिरोंचा तालुक्यात तापाची साथ पसरली आहे.
परिणामत: पल्लवी स्वामी बोंगोनी (१८), उषाराणी भूमय्या कोत्तावडला (१५), शिवाणी शंकर गंगाधरी (१४), दिव्या रमेश इंदलवार (१५) या विद्यार्थिनींना स्थानिक ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. दुपारी २ वाजतापासून टप्प्याटप्प्याने दाखल झालेल्या या मुलींवर रात्री उशिरापर्यंत उपचार सुरू होते. त्यांना श्वासोच्छवासास अडथळा होत असल्याने रात्री १ वाजता अहेरीस्थित उपजिल्हा रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात आले. सदर घटनेमुळे शिक्षक व पालकवर्गात भीतीचे सावट पसरले आहे. दरम्यान तालुका मुख्यालयापासून ७ किमी अंतरावरील आरडा येथील शारदा शंकर अरिगेला (२१) या विवाहित महिलेचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेच्या शरीरात केवळ ४ ग्रॅम हिमोग्लोबिनची मात्रा होती, असे डॉ. मनिष चव्हाण यांनी सांगितले. या सर्व रुग्णांवर डॉ. चव्हाण व प्रशिक्षणार्थी डॉ. शानू चौहान यांनी संयुक्तरित्या उपचार केले. असे असतानाच स्थानिक कस्तुरबा गांधी निवासी कन्या शाळेच्या शिक्षिका खापरे यांनी एका विद्यार्थिनीस ग्रामीण रुग्णालयात आणले. सदर मुलीचे नाव लक्ष्मी नागेश कोनमुला (१३) असून ती रामेशगुडमची रहिवासी आहे.
पूर्व खबरदारी म्हणून इतर १०-१२ विद्यार्थिनींचीही तपासणी करण्यात आली. विविध वयोगटातील या स्त्री रुग्णांच्या अत्यवस्थता व एका विवाहित महिलेच्या अकाली मृत्युमुळे तालुक्यातील जनमानस धास्तीने ढवळून निघाले आहे. दरम्यान सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी पवार यांनी रात्री ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन माहिती जाणून घेतली. (प्रतिनिधी)