महिलांची एसपी कार्यालयावर धडक
By Admin | Updated: April 12, 2015 02:12 IST2015-04-12T02:12:57+5:302015-04-12T02:12:57+5:30
गावात अवैधरित्या सुरू असलेल्या दारूविक्रीला कंटाळलेल्या चामोर्शी तालुक्यातील अनखोडा गावच्या महिला ....

महिलांची एसपी कार्यालयावर धडक
गडचिरोली : गावात अवैधरित्या सुरू असलेल्या दारूविक्रीला कंटाळलेल्या चामोर्शी तालुक्यातील अनखोडा गावच्या महिला गावातील १० लिटर मोहाची दारू पकडून दारूविक्रेत्यांवर कारवाई व्हावी, याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर शनिवारी धडकल्या. त्यानंतर त्यांनी गावातील अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
जिल्हास्तरावरील दारुबंदी पथकाचे अधिकारी दररोज कुठे ना कुठे दारुविक्रेत्यांवर धाड घालून कारवाई करीत आहेत, तर दुसरीकडे मात्र काही पोलीस दारुविक्रीकडे दुर्लक्ष करीत ठाण्यात बसून ढेकर देत आहेत. अशाच काही हप्तेबहाद्दर पोलिसांना कंटाळलेल्या अनखोडा येथील महिलांनी स्वत:च दारु पकडली आणि दारुच्या डबक्या घेऊनच त्या पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचल्या.
चामोर्शी तालुक्यातील अनखोडा हे गाव तसे मोठेच. जवळच आष्टी हे तालुक्याला शोभेल असे मोठे गाव आहे. तेथे पोलीस चौकीही आहे. पोलिसांचे तालुका मुख्यालय चामोर्शी येथे आहे. मात्र दोन्ही ठिकाणच्या पोलिसांच्या हाताला फारसे काम नाही. चामोर्शी तालुक्यात अनेक ठिकाणी सर्रास दारु विकण्यात येते. अनखोडा हे गावही त्यास अपवाद नाही. गाव दारुमुक्त व्हावे, यासाठी काही महिलांनी गावात ७ वर्षांपूर्वी संघर्ष बहुउद्देशिय महिला मंडळाची स्थापना केली. दारुमुळे गावातील शांतता भंग होऊ नये म्हणून या मंडळाच्या ३५ महिला सतत प्रयत्नशील असायच्या. तरीही गावात चार-पाच जण बिनबोभाटपणे दारु विकत होते. याबाबत महिला वारंवार संबंधित बिट जमादारास सूचना देत होत्या, परंतु जमादार महाशय महिलांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे महिलांनीच स्वत: पोलिसांची ड्युटी बजावण्याचे ठरविले.
मीराबाई एकोणकार, पार्वताबाई दाणे, रेखाबाई तागडे, शांताबाई आत्राम, मायाबाई घ्यार आदी महिलांनी पदर खोचला आणि थेट दारुविक्रेत्यांवर धाड टाकली. यावेळी जवळपास १० लिटर मोहफुलाची दारु त्यांच्या हाती लागली. त्यानंतर या महिला आष्टी किंवा चामोर्शी पोलिस ठाण्यात गेल्या नाही. आज दुपारी त्यांनी दारु घेऊनच थेट गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक कार्यालयच गाठले. काही क्षण तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात मोहफुलाच्या दारुचा घमघमाट अनुभवल्यानंतर त्या महिलांची विचारपूस सुरु झाली. त्यांनीही न घाबरता एसपींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी महिलांची तक्रार शांतपणे ऐकून घेत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली आणि तत्काळ ठाण्याबाहेर निघून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. गेल्या पंधरा दिवसांत या महिलांनी ३ वेळा दारु विक्रेत्यांवर धाडी घातल्या व दारू पकडून पोलिसांच्या स्वाधीन केली. (शहर प्रतिनिधी)