इरपनार येथे भयमुक्त प्रजासत्ताक दिन साजरा, जनसंघर्ष समितीने फाडले नक्षल बॅनर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2022 15:14 IST2022-01-27T15:08:08+5:302022-01-27T15:14:35+5:30
आदिवासी भागात सेवाकार्य करणाऱ्या जनसंघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी २६ जानेवारीला इरपनार गावात जाऊन प्रजासत्ताक दिन साजरा केला. यावेळी सामूहिक वंदे मांतरम आणि राष्ट्रगीत म्हणून देशभक्तीचा संदेश देण्यात आला.

इरपनार येथे भयमुक्त प्रजासत्ताक दिन साजरा, जनसंघर्ष समितीने फाडले नक्षल बॅनर्स
गडचिरोली : आदिवासी भागात सेवाकार्य करणाऱ्या जनसंघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी भामरागड तालुक्यातल्या इरपनार येथे प्रजासत्ताक दिन साजरा केला. या ठिकाणी तीन दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी वाहने जाळून विकासकामांना खोडा घातला होता. तर जनसंघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी नक्षलवाद्यांचे बॅनर्स फाडून भयमुक्त प्रजासत्ताक दिन साजरा केला.
भामरागड तालुक्यातल्या धोडराज पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत असलेल्या कुचेर, इरपनार या ठिकाणी पंतप्रधान ग्राम सडक योजने अंतर्गत कुचेर आणि इरपनार दरम्यान रस्त्याचे बांधकाम युद्ध पातळीवर सुरू आहे. आदिवासी भागात रस्ते, पूल आणि इतर सुविधांची निर्मिती यास नक्षलवादी कायम विरोध करतात. त्यामुळे गेल्या २१ जानेवारी रोजी नक्षलवाद्यांनी कुचेर आणि इरपनार भागात जाऊन तेथे काम करणारे कंत्राटदार आणि माजुरांना मारहाण करून पिटाळून लावले. तसेच रस्ता निर्मितीच्या कामात असलेली वाहने पेटवून टाकली. यामध्ये ९ ट्रॅक्टर, दोन जेसीबी, ग्रेडर इत्यादी अवजड वाहनांचा समावेश होता.
नक्षलवाद्यांनी वाहनांची जाळपोळ केल्यानंतर या भागात बॅनर लावून विकास कामांना मज्जाव केला होता. त्यामुळे या परिसरात दहशतीचे वातावरण होते. आदिवासींच्या मनातील नक्षलवाद्यांची दहशत घालवण्याच्या उद्देशाने जनसंघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता शिर्के यांच्या नेतृत्वात रितेश बडवाईक, संदीप आकरे, जगदीश वानोडे, रुपली नाटकर, आकाश फुलकर इत्यादी कार्यकर्त्यांनी २६ जानेवारी रोजी इरपनार गावात जाऊन प्रजासत्ताक दिन साजरा केला. आदिवासी बालकांच्या हाती राष्ट्रध्वज आणि फुगे दिले. यावेळी सामूहिक वंदे मांतरम आणि राष्ट्रगीत म्हणून देशभक्तीचा संदेश देण्यात आला.
नक्षलवाद्यांनी संवैधानिक मार्गावर चालावे - शिर्के
यासंदर्भात माहिती देताना जनसंघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता शिर्के यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हे सर्व समस्यांवर उत्तर आहे. भारतीय संविधान हे पिडीत, शोषित आणि वंचित आदिवासींची हिंमत आहे. संविधान हे सर्वांनाच भयमुक्त जगण्याचे शिकवण देते त्यामुळे आम्ही भयमुक्तीसाठीच याठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा केला. यावेळी शिर्के यांनी नक्षलवाद्यांना संविधानावर चालण्याचे आवाहन केले.