मृत्यूच्या दहशतीने दिला चार दशकांपूर्वीच्या घटनेला उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:38 IST2021-05-09T04:38:10+5:302021-05-09T04:38:10+5:30

मोहटोला (किन्हाळा) : सव्वा वर्षभरापूर्वी चीनमधून जगभरात पसरलेल्या काेराेना विषाणूमुळे संपूर्ण जग दहशतीत आहे. या व्हायरसची दुसरी लाट आपल्या ...

Fear of death rekindles what happened four decades ago | मृत्यूच्या दहशतीने दिला चार दशकांपूर्वीच्या घटनेला उजाळा

मृत्यूच्या दहशतीने दिला चार दशकांपूर्वीच्या घटनेला उजाळा

मोहटोला (किन्हाळा) : सव्वा वर्षभरापूर्वी चीनमधून जगभरात पसरलेल्या काेराेना विषाणूमुळे संपूर्ण जग दहशतीत आहे. या व्हायरसची दुसरी लाट आपल्या देशात पाेहाेचली आहे. या लाटेत मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे शहरांपासून तर गावखेड्यापर्यंत कोरोनाची भीती वाढली आहे. यापूर्वीही साथी आल्या नि गेल्या, परंतु या कोरोनाने जी दहशत निर्माण केली त्यानिमित्ताने ४१ वर्षांपूर्वीच्या ‘स्कायलॅब’ या उपग्रह कोसळण्याच्या दहशतीची आठवण ज्येष्ठांमध्ये ताजी झाली आहे.

अमेरिकेचा मानव निर्मित उपग्रह ‘स्कायलॅब’ पृथ्वीवर आणि तोही भारतातच कोसळणार अशा वावटळी ४० वर्षांपूर्वी उठल्या होत्या. हा उपग्रह कोसळल्यानंतर त्यातील रसायनांचा मोठा स्फोट होऊन निघणाऱ्या विषारी धुराने अनेक शहरे व गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडणार, अशी भीती सर्वत्र पसरली होती. १९७९-८० च्या काळात आजच्यासारखा इलेक्ट्राॅनिक किंवा सोशल मीडिया नसतानाही ती बातमी वाऱ्यासारखी गावागावात पोहाेचली होती. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात मृत्युछाया गडद झाली. खिशाला कात्री लावून जीवन जगणारी मंडळी देखील आपापला खिसा सढळ हाताने रिकामा करीत होते. कोणी घरातल्या घरात विविध मिष्टान्नावर ताव मारत तर कोणी आता जायचंच आहे, असे समजून दानातून पुण्य कमविण्याचा प्रयत्न करीत होते. सर्वधर्मीय स्थळांवर विविध पूजा-अर्चा, यज्ञ सुरू होते. आता मरण अटळ आहे, असे समजून अनेक जण मनातील इच्छा-आकांक्षांना वाट मोकळी करून देत होते. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येत होते. तर काही ठिकाणी मृत्यूच्या भीतीने स्मशानशांतता होती. ज्यांच्याकडे रेडिओ होत्या. त्यांच्याकडे बातम्या ऐकणाऱ्यांची गर्दी असायची. खेड्यापाड्यात तर चौकाचौकात रेडिओवरील बातम्यांकरिता गर्दी असायची.

विषारी वायू आणि स्फोटातून जिवंत राहता यावे म्हणून काहींनी जमिनीत भुयार केले होते. किमान आपल्या पाल्यांना तरी जीवन जगता यावे म्हणून भुयाररुपी संदुकात ठेवून त्या संदुकावर लाकडी पाट्या ठेवून वरून मातीचे लेपणही ठेवल्याच्या घटना घडल्या होत्या. दरम्यान, देशात सतर्कतेचा इशारा देण्यात आला हाेता. जागोजागी पोलीस व सैन्यांचे ताफे दिसत होते. परंतु अखेर अथक परिश्रम घेऊन तत्कालीन शास्त्रज्ञांनी हिंदी महासागरात तो स्कायलॅब पाडला. या घटनेने देशावरील संकट टळले हाेते. देशात जल्लोष करण्यात आला. कोरोनाचे संकट देखील टाळण्यासाठी जोमाने प्रयत्न सुरू आहेत. परंतु हे संसर्गाचे संकट पूर्णपणे केव्हा ओसरेल हे सांगणे कठीण आहे.

बाॅक्स

असा होता स्कायलॅब

स्कायलॅब हा उपग्रह अमेरिकेने १४ मे १९७३ रोजी अंतराळात सोडला होता. सतत पाच वर्षे सुरळीत कार्य केल्यानंतर नासाच्या रिपोर्टनुसार १९७८- ७९ मध्ये अंतराळात सौर उर्जेचे भयानक वादळ उठले. त्यात स्कायलॅबचे संपूर्ण पॅनल जळून खाक झाले होते. म्हणून हळूहळू त्यातील इंजिनने काम करणे बंद केले. त्यामुळे तो पृथ्वीकडे सरकत होता. हा उपग्रह भारतावरच पडू शकतो, असा अंदाज शास्त्रज्ञांनी बांधला होता. त्याची लांबी ८२.४ फूट व रुंदी ५८.८ फूट तर उंची ३६.३ फूट आणि वजन ७ हजार ७०० क्विंटल हाेते.

Web Title: Fear of death rekindles what happened four decades ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.