कोरोनाच्या भीतीमुळे शुगर, बीपी रुग्णांच्या तपासणी व उपचारात खंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:39 IST2021-05-06T04:39:05+5:302021-05-06T04:39:05+5:30

आरमोरी : कोरोनाच्या संसर्गबधितांची संख्या जिल्हाभरात वाढतच आहे. तालुकास्तरावरील शासकीय रुग्णालय, कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाबधितांवर उपचार सुरू ...

Fear of corona, volume in the examination and treatment of sugar, BP patients | कोरोनाच्या भीतीमुळे शुगर, बीपी रुग्णांच्या तपासणी व उपचारात खंड

कोरोनाच्या भीतीमुळे शुगर, बीपी रुग्णांच्या तपासणी व उपचारात खंड

आरमोरी : कोरोनाच्या संसर्गबधितांची संख्या जिल्हाभरात वाढतच आहे. तालुकास्तरावरील शासकीय रुग्णालय, कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाबधितांवर उपचार सुरू असल्याने ग्रामीण भागातील शुगर (मधुमेह), बीपीचा (रक्तदाब) त्रास असणाऱ्या, तसेच इतर आजारांच्या अनेक रुग्णांच्या नियमित तपासणी आणि उपचारातही खंड पडत आहे. रुग्णालयात गेलो तर आपल्यालाही कोरोनाची लागण तर होणार नाही ना, या भीतीने ग्रासलेले असे शेकडो रुग्ण डॉक्टरांचा सल्ला घेण्यासही घाबरत आहेत.

एरव्ही नियमित तपासणीला जात असले तरी सध्या कोरोनाच्या भीतीने ते घरीच पडून राहतात. आरमोरी तालुक्यासह जिल्हाभरात ही स्थिती असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात सर्वांत जास्त रुग्ण हे शुगर, बीपी व इतर आजारांचे आहेत. ५० वर्षांवरील व्यक्तींमध्ये हे आजार सर्रास दिसतात. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील शुगर-बीपीने ग्रस्त रुग्ण तालुकास्तरावरील शासकीय रुग्णालयात जाऊन नियमित तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत होते. मात्र, आता कोरोनाच्या भीतीमुळे लोक रुग्णालयात जाण्यासाठीच घाबरत आहेत.

डिसेंबरअखेरपर्यंत कोरोनाची पहिली लाट ओसरली, त्यामुळे कोरोना गेला असे वाटत असताना पुन्हा पहिल्या लाटेपेक्षाही प्रभावी अशी दुसरी लाट आली. या लाटेने शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात पाय पसरले आहे. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असून बाधितांची संख्याही वाढत आहे. अनेकांना आपला जीवही गमवावा लागला. त्यामुळे लोकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरी भागातील काही रुग्ण खासगी रुग्णालयात जाऊन उपचार करत आहेत. मात्र, ग्रामीण भागातील गरीब रुग्ण दवाखान्यात न जाता त्रास सहन करत घरीच पडून आहेत. कोरोनाच्या घातक परिस्थितीत शुगर, बीपी रुग्णाच्या नियमित तपासणी व उपचारात खंड पडणे त्यांच्या प्रकृतीसाठी घातक ठरू शकते.

(बॉक्स)

रुग्णांमध्ये गैरसमजच जास्त

कोरोनाबधितांची संख्या वाढत असल्याने तालुकास्तरावरही शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोणत्याही खासगी रुग्णालयाला कोरोनाग्रस्त रुग्णाच्या उपचाराची परवानगी अद्याप नसली तरी कोरोनाची लक्षणे असलेले अनेकजण खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शुगर, बीपीचा त्रास असलेले व अन्य आजारांचे रुग्ण दवाखान्यात कोरोनाचे रुग्ण आहेत म्हणून शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयातही जायला घाबरत आहेत.

(बॉक्स)

रुग्णालयात जायचे कशाने?

रुग्णालयात गेल्यावर डॉक्टर कोरोनाची टेस्ट करायला लावतात, रुग्णाला हातही लावत नाही, अशी भीती आणि गैरसमज अनेकांमध्ये आहे. त्यातच एस. टी. बससेवा बंद असल्याने ग्रामीण भागातील रुग्णाला रुग्णालयात जायला साधन नाही. त्यामुळे रुग्णालयात जायचे तरी कशाने, हाही प्रश्न अनेकांसमोर आहे.

Web Title: Fear of corona, volume in the examination and treatment of sugar, BP patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.