शिक्षण क्षेत्रात काम करायला मिळाले हे भाग्य
By Admin | Updated: July 3, 2017 01:13 IST2017-07-03T01:13:09+5:302017-07-03T01:13:09+5:30
शाळासिद्धी उपक्रम हे शासनाचे सकारात्मक विचाराचे पाऊल आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास रूजणे म्हणजे गुणवत्ता होय,

शिक्षण क्षेत्रात काम करायला मिळाले हे भाग्य
शिक्षण परिषद : मुबारक सय्यद यांचे प्रतिपादन
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : शाळासिद्धी उपक्रम हे शासनाचे सकारात्मक विचाराचे पाऊल आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास रूजणे म्हणजे गुणवत्ता होय, शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात आपल्याला काम करायला मिळाले, हे आपले भाग्य आहे, असे प्रतिपादन शासनाच्या शाळासिद्धी उपक्रमात महाराष्ट्रातून प्रथम आलेल्या भंडारा जिल्ह्यातील खराशी जि. प. शाळेचे मुख्याध्यापक मुबारक सय्यद यांनी केले.
सन २०१७-१८ सत्रातील जिल्ह्यातील प्रथम बिटस्तरीय शिक्षण परिषद जोगीसाखरा येथील शाळेत शनिवारी घेण्यात आली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या परिषदेचे उद्घाटन जोगीसाखरा शाळेचे मुख्याध्यापक अशोक सोरते होते. मार्गदर्शक म्हणून साधनव्यक्ती चांगदेव सोरते, प्रमुख अतिथी म्हणून जि. प. सदस्य वंदना दोनाडकर, अधिव्याख्याता धनंजय चापले, गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा, केंद्रप्रमुख कैलास टेंभूर्णे, वसंत फटिंग, शंकर बोरकर, चंद्रकला बारापात्रे, गणवीर, मिलींद खोब्रागडे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी चांगदेव सोरते म्हणाले, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम हा प्रगती व बदलाचा मूलमंत्र आहे. हा कार्यक्रम आल्यापासून शिक्षण क्षेत्राची स्थिती बदललेली आहे व यापुढेही बदलणार आहे.
यावेळी मुख्याध्यापक मुबारक सय्यद म्हणाले, शिक्षकांनी स्वत:ला ओळखून व त्यात बदल करून वातावरण बदलविले पाहिजे, आव्हाने स्वीकारून कार्य करण्याची गरज आहे. माझ्या शाळेतील मुले प्रगत होणे हा आनंदच अद्वितीय आहे. माणूस व शिक्षक म्हणून माझी भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे शिक्षकांनी गुणवत्ता वाढीकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे, असे आवाहन सय्यद यांनी यावेळी केले. प्रास्ताविक केंद्रप्रमुख ठेंभूर्णे, संचालन गुणवंत हेडाऊ यांनी केले आभार बुल्ले यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रभाकर गडपायले, गुलाब मने, अशोक डांगे, पीतांबर प्रधान यांच्यासह दोन्ही केंद्रातील शिक्षकांनी सहकार्य केले.