शेतकरीही होणार कॅशलेस
By Admin | Updated: February 1, 2017 00:43 IST2017-02-01T00:43:23+5:302017-02-01T00:43:23+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जिल्हाभरातील १७ हजार शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्याच्या पूर्वी रूपे केसीसी कार्डचे वितरण केले जाणार आहे.

शेतकरीही होणार कॅशलेस
१७ हजार केसीसी कार्डचे वितरण : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा उपक्रम
गडचिरोली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जिल्हाभरातील १७ हजार शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्याच्या पूर्वी रूपे केसीसी कार्डचे वितरण केले जाणार आहे. या कार्डच्या मदतीने शेतकरी खते, बि-बियाणे पॉस मशीनच्या मदतीने खरेदी करू शकणार आहेत. त्यामुळे कॅशलेस व्यवहारांना चालना मिळण्यास मदत होणार आहे.
खरीप हंगामामध्ये बहुतांश शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कृषी कर्ज घेतात. यापूर्वी शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड दिले जात होते. किसान क्रेडीट कार्डसोबत चेकबूकही दिला जात होता. या धनादेशाच्या मदतीने संबंधित शेतकरी त्याला जेवढ्या रकमेची गरज आहे. तेवढीच रक्कम धनादेशाच्या माध्यमातून काढेल त्यामुळे अनावश्यक कामासाठी रक्कम खर्च होाणार नाही. हा या मागे उद्देश होता. मात्र धनादेश वटविण्यासाठी शेतकऱ्याला बँकेच्या रांगेत उभे राहावे लागत असल्याने बहुतांश शेतकरी एकाच वेळी मंजूर झालेल्या कर्जाची रक्कम धनादेशाच्या मदतीने काढत होते. या सर्व प्रकारावर आळा घालून शेतकऱ्यांना कॅशलेस व्यवहारांची सवय लागावी यासाठी बँकेने संबंधित शेतकऱ्यांना रूपे केसीसी कार्ड वितरित करण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षीपासून याची अंमलबजावणी सुरू झाली. मागील वर्षी पाच हजार शेतकऱ्यांना कार्डचे वितरण करण्यात आले. यावर्षी मात्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कॅशलेस व्यवहारांना चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयात शेतकऱ्यांनाही समाविष्ट करून घेण्यात आले आहे. या अंतर्गत कृषी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना रूपे केसीसी कार्डचे वितरण केले जाणार आहे. सदर कार्ड हा एकप्रकारचा एटीएम कार्ड असून या कार्डाच्या मदतीने शेतकऱ्याला त्याच्या कर्जाची रक्कम काढता येणार आहे. त्यामुळे बँकेच्या रांगेत राहण्याची गरज नाही. त्याचबरोबर सॉप मशीनच्या मदतीने कार्ड स्वाईप करून खते, बि-बियाणे खरेदी करू शकणार आहे. यामुळे शेतकरीही कॅशलेस व्यवहार करू शकणार आहे. शेतकऱ्यांकडे रूपे केसीसी कार्ड उपलब्ध झाल्यास जिल्ह्यात कॅशलेस व्यवहारांना मोठ्या प्रमाणात चालना मिळण्यास मदत होणार आहे. (नगर प्रतिनिधी)
कृषी कर्जाचा दुरूपयोग थांबणार
शेतकऱ्यांना कृषी कर्जाचे वितरण शेतीच्या मशागतीला येणारा खर्च भागविण्यासाठी दिला होतो. मात्र बहुतांश शेतकरी बँकेत चकरा माराव्या लागतात. या त्रासापायी एकाचवेळी कर्जाची रक्कम काढून घेतात. तोपर्यंत शेतीची कामे सुरू झाली राहत नसल्याने कृषी कर्जाच्या रकमेचा उपयोग इतर कामासाठी केला जातो. शेतकऱ्यांना रूपे केसीसी कार्ड वितरित झाल्यास त्यांना कधीही पैसे उपलब्ध होतील. त्यामुळे ते ज्यावेळी गरज पडेल त्याचवेळी एटीएममधून पैसे काढतील. त्याचबरोबर रूपे कार्डच्या मदतीने कॅशलेस व्यवहारांना चालना मिळेल. हा मुख्य उद्देश या मागे आहे.
मागील वर्षीपासून शेतकऱ्यांना रूपे केसीसी कार्डचे वितरण केले जात आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी रूपे केसीसी कार्डचे वितरण करण्याची योजना पुढे आणली आहे. मागील वर्षी पाच हजार कार्ड वितरित करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर बँकेने यावर्षी २८ फेब्रुवारीपूर्वी १७ हजार शेतकऱ्यांना रूपे केसीसी कार्डचे वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन लाभार्थी शेतकऱ्यांनाही रूपे केसीसी कार्ड दिले जाईल.
-सतीश आयलवार, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.