शेतकरी धान विक्रीच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: December 30, 2014 23:34 IST2014-12-30T23:34:39+5:302014-12-30T23:34:39+5:30
आदिवासी विकास महामंडळ नाशिक अंतर्गत उपप्रादेशिक कार्यालय अहेरी मार्फत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्यावतीने सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथे धान खरेदी केंद्र सुरू

शेतकरी धान विक्रीच्या प्रतीक्षेत
सिरोंचा : आदिवासी विकास महामंडळ नाशिक अंतर्गत उपप्रादेशिक कार्यालय अहेरी मार्फत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्यावतीने सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रावर २७ डिसेंबरपर्यंत १ हजार ८१६ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. मात्र केंद्रावर धान विक्रीसाठी नेलेले अनेक शेतकरी प्रतीक्षेत असल्याचे दिसून आले.
आदिवासी विकास महामंडळामार्फत शासनाच्या आधारभूत योजनेंतर्गत प्रती क्विंटल १ हजार ३६० हमी भावाने अंकिसा केंद्रावर २४ डिसेंबरपासून धान खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. आज मंगळवारला केंद्राला भेट दिली असता, आतापर्यंत १ हजार ८१६ क्विंटल धानाची खरेदी झाली असून या धानाच्या पोत्याची थप्पी लावण्याचे काम हमालामार्फत सुरू असल्याचे दिसून आले. अंकिसा येथील केंद्रावर असलेल्या एकमेव गोदामात जवळपास १ हजार क्विंटल धानाची साठवणूक करता येते. गोदामाअभावी उर्वरित धानाचे पोते खुल्या प्रांगणात ठेवण्यात आले होते. धान विक्रीची रक्कम १५ ते २० दिवसांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यातच जमा करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी प्रतवारीक (ग्रेडर) मनोज धर्माजी इटनकर यांनी लोकमतच्या प्रतिनिधीला सांगितले. धानविक्रीची रक्कम नगदी मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांची अडचण होत असल्याचे यावेळी स्पष्टपणे जाणवले. (शहर प्रतिनिधी)