वैरागडातील शेतकरी जीव धोक्यात घालून जातात शेतावर
By Admin | Updated: August 24, 2015 01:27 IST2015-08-24T01:27:19+5:302015-08-24T01:27:19+5:30
रांगी-धानोरा या मुख्य मार्गावरून आरकबोडी ते बरडापर्यंत पांदन रस्त्याचे काम करण्यात आले आहे.

वैरागडातील शेतकरी जीव धोक्यात घालून जातात शेतावर
वैरागड : रांगी-धानोरा या मुख्य मार्गावरून आरकबोडी ते बरडापर्यंत पांदन रस्त्याचे काम करण्यात आले आहे. मात्र या मार्गावर असलेल्या नाल्यावरून जाण्यासाठी पुलाचे बांधकाम करण्यात आले नाही. परिणामी शेतकऱ्यांना नाल्यातून जीव धोक्यात घालून शेतावर जावे लागत आहे.
सन २००९-१० मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत आरकबोडी ते बरडापर्यंत पांदन रस्ता बांधण्यात आला. या मार्गावर असलेल्या नाल्यावर प्रशासनाच्या वतीने सिमेंटचे पाईप टाकण्यात आले होते. मात्र या ठिकाणी पाण्याचा प्रवाह अतिशय जास्त असल्याने सदर पाईप पावसाळ्यात वाहून गेले होते. तेव्हापासून शेतकऱ्यांना या मार्गाने शेतीवर जाण्याची अडचण निर्माण होत आहे. बऱ्याच वेळा या नाल्यातून पाच फुटापेक्षाही अधिक पाणी राहत असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर या ठिकाणावरून बैलबंडी, ट्रॅक्टर आदी साहित्य शेतीवर नेण्यासाठी अडचण होत आहे. पांदन रस्त्याच्या ठिकाणी पूल बांधून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. ग्रामपंचायतीला रोजगार हमी योजनेंतर्गत निधीसुध्दा उपलब्ध होतो. त्यामुळे या ठिकाणी पुलाचे बांधकाम तत्काळ करावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.