शेतकऱ्याच्या घरचे सामान केले जप्त
By Admin | Updated: June 30, 2015 02:13 IST2015-06-30T02:13:17+5:302015-06-30T02:13:17+5:30
आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथील शेतकरी खेमराज सामृतवार यांच्या घरावर सोमवारी सकाळी गडचिरोली जिल्हा

शेतकऱ्याच्या घरचे सामान केले जप्त
ठाणेगाव : आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथील शेतकरी खेमराज सामृतवार यांच्या घरावर सोमवारी सकाळी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वसुली पथकाने धडक देऊन पोलिसांच्या उपस्थितीत त्यांच्या घरातील सामान जप्त करून नेले. या कारवाईमुळे शेतकरी कुटुंब प्रचंड दडपणात आले आहे. गावात आपली बेअब्रू झाल्याने आत्महत्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचे शेतकरी खेमराज सामृतवार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
खेमराज सामृतवार यांनी १२ सप्टेंबर २०१० ला नाबार्डच्या सहाय्याने (५० टक्के लाभार्थी ५० टक्के नाबार्ड) दुग्ध व्यवसायाकरिता २ लाख ६५ हजार ९५६ रूपयाचे कर्ज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आरमोरी शाखेकडून घेतले होते. परंतु त्यानंतर कुठल्याही प्रकारच्या कर्जाचा भरणा लाभार्थी व नाबार्ड यांच्याकडून करण्यात आला नाही. त्यामुळे बँकेने २० जानेवारी २०१४ ला कर्ज मागणीचा पहिला नोटीस पाठविला. त्यानंतर १९ एप्रिल २०१४ ला दुसरा नोटीस पाठविला. परंतु लाभार्थी व नाबार्ड यांनी बँकेच्या या नोटीसला कुठलीही दाद दिली नाही व कर्जाचा भरणाही केला नाही. तेव्हा बँकेने जप्तीपुर्वीचा नोटीस १९ आॅक्टोबर २०१४ ला पाठविला. सदर कर्जावर मार्च २०१३ अखेरपर्यंत ५६ हजार ४१२ रूपये व्याज झालेले आहे. त्यामुळे जप्तीची कारवाई करण्यात आली. या कारवाईबाबत माहिती देताना जिल्हा सहकारी बँकेच्या वसुली पथकाचे प्रमुख गिरीष नरड म्हणाले की, आमच्या पथकाने सोमवारी त्यांच्या घरी भेट देऊन कर्ज भरण्याबाबत त्यांना विचारणा केली. परंतु त्यांनी असमर्थता दर्शवून उडवाउडवीचे उत्तर दिले व टाळाटाळ केली. त्यामुळे पोलिसांना बोलावून ५० हजार रूपये रक्क्म भरण्यास सांगितले. परंतु ते भरण्यासही असमर्थता दर्शविली. २० हजार रूपये भरण्याबाबतही कुठलीही गोष्ट केली नाही. सदर कारवाई ही सूड भावनेने झालेली नसून मागील दोन महिन्यांपासून जिल्हाभरासह चामोर्शी, कुरखेडा तालुक्यातही अशा कारवाया करण्यात आल्या आहे. ठाणेगाव येथील सोनवणे यांनी २५ हजार रूपये भरले, अशी माहितीही त्यांनी दिली. शेतीचा हंगाम असला तरी ही कारवाई नियमानुसारच झालेली आहे, असे ते म्हणाले. बँकेच्या या कारवाईची ठाणेगावसह पंचक्रोशीत चर्चा होती.
काय म्हणतात शेतकरी सामृतवार?
मात्र शेतकरी खेमराज सामृतवार यांनी आपण करीत असलेल्या दुग्ध व्यवसायातून कुठलाही नफा आपल्याला झालेला नाही. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसातरी चालत आहे. माझी परिस्थिती कर्ज भरण्याची नाही. त्यामुळे मी परतफेड करू शकलो नाही. आज दुसऱ्याकडून मागून २० हजार रूपये भरण्याची तयारी दर्शविली होती. परंतु पथकातील अधिकाऱ्यांनी ५० हजार रूपयेच भरावे लागतील, असे सांगितले. एक-दोन दिवसांची मुदत द्या, अशी मागणी केली. परंतु तीही फेटाळून लावली व पोलीस आणून माझ्या घरातील सामान जबरदस्तीने उचलून नेले. या घटनेमुळे आपल्या अभू्रला डाग लागला आहे. आत्महत्येशिवाय पर्याय नाही, अशी हतबल भावना त्यांनी व्यक्त केली.
काय साहित्य नेले शेतकऱ्याच्या घरून?
ठाणेगाव येथील खेमराज सामृतवार यांच्या घरी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज वसुली पथकाने २९ जून २०१५ ला सामृतवार यांच्या घरी जप्तीची कारवाई केली. त्यांच्याकडील फ्रीज, कुलर, टीव्ही, दिवाण, टी-टेबल, लाकडी टेबल, हिरोहोंडा कंपनीची मोटार सायकल जप्त केली.