धरणाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

By Admin | Updated: January 28, 2016 01:10 IST2016-01-28T01:10:09+5:302016-01-28T01:10:09+5:30

गोदावरी नदीवर मेडिगट्टा-कालेश्वर धरणाचे काम महाराष्ट्राच्या सीमेला लागून करण्यात येत आहे.

Farmers Elgar Against the Dam | धरणाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

धरणाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

सिरोंचात निघाला मोर्चा : मेडिगट्टा-कालेश्वर धरण कामाचे सर्वेक्षण बंद करा
सिरोंचा : गोदावरी नदीवर मेडिगट्टा-कालेश्वर धरणाचे काम महाराष्ट्राच्या सीमेला लागून करण्यात येत आहे. या कामाकरिता गेल्या काही दिवसांपासून सिरोंचापासून २२ किमी अंतरावर पोचमपल्ली भागात सर्वेक्षण दोन्ही राज्याचे अधिकारी संयुक्तपणे करीत आहे. या प्रकल्पामुळे २२ गावे बाधित होणार असल्याने या भागातील शेतकऱ्याचा या प्रकल्पाला प्रचंड विरोध आहे. या विरोधात बुधवारी सिरोंचा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा नेऊन रोष व्यक्त केला. या मोर्चाचे नेतृत्व मेडिगट्टा धरण विरोधी संघटनेच्या किसान आघाडी संघटनेचे अध्यक्ष मधुसुधन आरवेली, कोमरे वेंकन्ना, लग्गा सत्यम, भंडारी समय्या, नागेश गागापुरम, सतीश भोगे आदींनी केले.
यावेळी मोर्चेकऱ्यांची माजी आ. पेंटारामा तलांडी यांनीही भेट घेऊन मोर्चाला आपला पाठिंबा दर्शविला. सिरोंचा तालुक्यातून गोदावरी, प्राणहिता, इंद्रावती या तीन नद्या वाहतात. आॅगस्ट महिन्यात दरवर्षी सिरोंचा तालुक्यातील २२ ते २३ गावांना पुराचा फटका बसतो. तेलंगणाच्या प्रस्तावित असलेल्या मेडिगट्टा-कालेश्वर धरणामुळे या परिसरातील नलीकुडा, कोत्तापल्ली, चुनामचन, वागू, पोचमपल्ली, वडधम, आईपेठा, तुमनूर, पेंटीपाका, लंबडपल्ली, क्रिष्णापूर, आरडा, राजन्नापल्ली, जानमपल्ली, चिंतलपेठ, रामक्रिष्णापूर, सिरोंचा, गर्कापेठा, गोल्लागुडम, टेकडाचेक, जाफ्राबाद चेक, मुकेला आदी २१ गावांतील अंदाजे ३०७० एकर (१२२७.३१ हेक्टर आर) शेत जमिनीसह घरे पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्राच्या सिरोंचा तालुक्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान या धरणामुळे होणार आहे. या भागात कापूस, ज्वारी, मिरची आदी पिके घेतले जातात. शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त होणार असल्याचे या मोर्चाला मार्गदर्शन करताना शेतकरी नेते मधुसुदन आरवेली यांनी सांगितले.
या मोर्चादरम्यान के.सी.आर. हाय हाय, सिरोंचा को डुबने से बचाओ, पालकमंत्री निंद से जागो, मेडिगट्टा-कालेश्वर बॅरेज बंद करा, महाराष्ट्र गर्व्हनर हाय हाय, जय जवान, जय किसान, वंदे मातरम, गर्व्हनर को हटाओ सिरोंचा बचाओ, अशा प्रचंड घोषणा देण्यात आल्या. मोर्चा स्थानिक शेतकरी भवनातून तहसील कार्यालयावर धडकला. नायब तहसीलदार सत्यनारायण कडार्लावार यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी शेकडोंच्या संख्येत शेतकरी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Farmers Elgar Against the Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.