शेतकरी पाण्यापासून वंचित
By Admin | Updated: February 28, 2017 00:51 IST2017-02-28T00:51:04+5:302017-02-28T00:51:04+5:30
चामोर्शी तालुक्यातील रेगडी जलाशयालगतची १४ गावे अद्यापही जलाशयाच्या पाण्यापासून वंचित आहेत.

शेतकरी पाण्यापासून वंचित
रेगडी जलाशय : कालवा खोदण्याची १४ गाववासीयांची मागणी
भाडभिडी : चामोर्शी तालुक्यातील रेगडी जलाशयालगतची १४ गावे अद्यापही जलाशयाच्या पाण्यापासून वंचित आहेत. इतर गावांना ज्या प्रकारे पाणी पुरवठा केला जातो. त्याप्रमाणे १४ गावातील शेतकऱ्यांना जलाशयातून कालवा खोदून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
संपूर्ण जिल्ह्यातील एकमेव सिंचन प्रकल्प म्हणजे चामोर्शी तालुक्यातील रेगडी गावालगतच्या दिना नदीवर असलेले कन्नमवार जलाशय होय. १९६२ मध्ये चामोर्शी तालुक्यातील रेगडी गावालगत वाहणाऱ्या दिना नदीवर धरण बांधून तालुक्यातील ६६ गावातील ९ हजार ६६० हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यात आली. असे असले तरी दिना धरणालगतच्या १४ गावातील शेतींना दिना धरणाचे पाणी मिळत नाही. धरणाचा कालवा जात असला तरी शेतीला पाणी मिळ नाही. अशी स्थिती आहे. त्यामुळे १४ गावांना नेहमीच दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यामुळे नवीन कालवा बांधून शेतीला पाणी देण्याची मागणी दिना धरणालगतच्या १४ गावातील शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे केली. मात्र प्रत्यक्षात काहीच घडले नाही. दिना धरणालगतच्या चापलवाडा, चनकापूर, मक्केपल्ली, गोलबोंदरी, गांधीनगर, वरूर, पुसगुडा, पलसपूर, पोतेपल्ली, माडेआमगाव, सीमुलतला, श्यामनगर, कोळसेगट्टा, मछली आदी १४ गावांना पाणीपुरवठा होत नसल्याने येथील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. सदर गावातील शेतीही उंच भागात विस्तारली आहे. त्यामुळे येथे कालव्याचे बांधकाम करण्यात आले नाही. मात्र मुख्य कालव्याचे पाणी उंच भागात अडवून नवीन उपकालव्याद्वारे पाणी पुरवठा करून सिंचन पुरवठा केल्या जाऊ शकते, अशी फार जुनी मागणी १४ गावातील शेतकऱ्यांची आहे. निवडणुकीच्या तोंडावर लोकप्रतिनिधी केवळ आश्वासन देण्याचे काम करतात मात्र प्रत्यक्षात काहीच होत नाही. आजवर दिलेले आश्वासन केवळ दिवास्वप्न ठरत आहे. त्यामुळे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)