रोवणी यंत्रांचा पुरवठा लांबल्याने शेतकऱ्यांमध्ये गोंधळ

By Admin | Updated: June 21, 2015 02:14 IST2015-06-21T02:14:24+5:302015-06-21T02:14:24+5:30

१५ दिवसांनंतर रोवणीच्या कामाला सुरूवात होणार आहे. मात्र कृषी विभागाच्या मार्फतीने पुरविण्यात येणारे भात रोवणी यंत्र व इतर साहित्य अजुनही प्राप्त झाले नाही.

Farmers' confusion due to the delay in delivery of the equipment | रोवणी यंत्रांचा पुरवठा लांबल्याने शेतकऱ्यांमध्ये गोंधळ

रोवणी यंत्रांचा पुरवठा लांबल्याने शेतकऱ्यांमध्ये गोंधळ

गडचिरोली : १५ दिवसांनंतर रोवणीच्या कामाला सुरूवात होणार आहे. मात्र कृषी विभागाच्या मार्फतीने पुरविण्यात येणारे भात रोवणी यंत्र व इतर साहित्य अजुनही प्राप्त झाले नाही. त्यामुळे पऱ्हे नेमके कशा पध्दतीने टाकावे, अशा द्विधा मन:स्थितीत शेतकरी सापडला आहे.
जिल्हा परिषदेच्या मार्फतीने शेतकरी गटांना पॉवर टिलर, भात रोवणी यंत्र, पॉवर व्हिडर, कोनोव्हिडर, भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र यांचा संच उपलब्ध करून दिले जाते. यावर्षी जिल्हा प्रशासनाने मानव विकास मिशन अंतर्गत ४५ सर्वसाधारण योजनेंतर्गत २८ व आदिवासी उपयोजनेंतर्गत १४ असे एकूण ८७ साहित्याचे संच मंजूर करण्यात आले. यातील भात रोवणी यंत्र अत्यंत महत्त्वाचे यंत्र असून याचा वापर १५ दिवसानंतर सुरू होणार आहे. मात्र अजुनपर्यंत जिल्हा परिषदेला सदर यंत्र प्राप्त झाले नाही. रोवणी आटोपल्यावर यंत्र प्राप्त झाल्यास सदर यंत्र वर्षभर केवळ शोभेची वस्तू म्हणून वापरावी लागणार आहे. त्याचबरोबर त्यावर झालेल्या खर्चाचा बोझाही संबंधित शेतकऱ्यांना उचलावा लागणार आहे.
ज्या शेतकरी गटांना साहित्याचे संच मंजूर झाले. संबंधित शेतकरी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना यंत्राबाबत वेळोवेळी विचारणा करीत आहेत. मात्र यंत्रच उपलब्ध न झाल्याचे कारण सांगितले जात आहे. मागील वर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण यंत्रांचा संच उपलब्ध झाला होता व शेतकऱ्यांना यंत्र कसे चालवावे याबाबतचे प्रशिक्षणही देण्यात आले. यावर्षी मात्र पावसाळा सुरू होऊनही यंत्र उपलब्ध झाले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनात यंत्र उपलब्ध होणार की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे. कृषी विभागाने या गंभीर बाबीकडे लक्ष घालून तत्काळ यंत्रांचा पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. शेतकऱ्यांची चिंता सध्या वाढत आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Farmers' confusion due to the delay in delivery of the equipment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.