विजेच्या लपंडावाने शेतकरी हैराण
By Admin | Updated: October 9, 2014 23:01 IST2014-10-09T23:01:32+5:302014-10-09T23:01:32+5:30
गेल्या महिनाभरापासून पावसाने उसंत घेतल्यामुळे कमी मुदतीचे हलक्या प्रतीचे धानपिक धोक्यात आले आहे. वैरागड परिसरातील शेतकरी मिळेल त्या साधनाने कृत्रिमरित्या धानपिकाला

विजेच्या लपंडावाने शेतकरी हैराण
वैरागड : गेल्या महिनाभरापासून पावसाने उसंत घेतल्यामुळे कमी मुदतीचे हलक्या प्रतीचे धानपिक धोक्यात आले आहे. वैरागड परिसरातील शेतकरी मिळेल त्या साधनाने कृत्रिमरित्या धानपिकाला पाणीपुरवठा करण्यासाठी धडपड करीत आहेत. मात्र वैरागड परिसरात विद्युत विभागाच्या भोंगळ कारभारामुळे विजेच्या लपंडावाच्या समस्येमुळे शेतकरी हैराण झाले आहेत.
वैरागड परिसरातील ज्या शेतकऱ्यांकडे विद्युत पंपाद्वारे सिंचन करण्याची व्यवस्था आहे, असे शेतकरी शेतालगत असलेल्या पाण्याच्या स्त्रोतावर विद्युत मोटारपंप लावून हलक्या तसेच जडप्रतीच्या धानपिकाला पाणीपुरवठा करीत आहेत. मात्र या भागामध्ये वारंवार विद्युतपुरवठा खंडीत होत आहे. त्यामुळे हाती आलेले धानपिक गमविण्याची वेळ या भागातील शेतकऱ्यांवर आली आहे. रोज दिवसा दुपारी ३ वाजतापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत वैरागड परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत होत आहे. रात्रीच्या सुमारास विजेचा पुरेसा दाबही नसतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे विद्युत पंप निकामी ठरत आहेत. या संदर्भात अनेक शेतकऱ्यांनी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केले असता, विद्युत पुरवठ्यांमध्ये वरूनच बिघाड आहे. असे उत्तर मिळत आहे. वैरागड येथे विद्युत विभागाचे कार्यालय आहे. मात्र या समस्येकडे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. वैरागड येथे एक नवीन जनित्र उभारण्यात आले. मात्र या जनित्राची विद्युततारांशी जोडणी करण्यात आली नाही. (वार्ताहर)