दिलीप दहेलकर, गडचिराेली - जंगलात दिसणाऱ्या माेहाेळाला बघून भल्याभल्यांना थरकाप सुटताे. पण राहत्या घरात माेहाेळ सोबत असेल तर काय अवस्था होईल, याची कल्पना न केलेली बरी. पण तरीही निसर्गाच्या जैवविविधतेशी मानवाचे नाते हे नैसर्गिक आहे आणि ते जोपासले पाहिजे, असा संदेश काही पर्यावरण प्रेमी नागरिक प्रत्यक्ष कृतीतून देत आहे. गडचिराेली जिल्हयाच्या आरमाेरी तालुक्यातील शंकरनगर येथील कुटुंब गेल्या पाच वर्षांपासून एकाच घरात मधमाश्यांच्या सोबत जीवन व्यतीत करीत आहे. मात्र निसर्गाच्या जैवविविधतेशी असलेले हे इतरांसाठी हा आश्चर्याचा विषय बनला आहे.
शंकरनगर येथील रहिवासी व चुरमुरा येथील ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आलोक राॅय यांच्या राहते घरी खोल्यांमध्ये तसेच बाल्कनीमध्ये मधमाश्यांचे अनेक पोळ आहेत. सहा सदस्य असलेले राॅय कुटुंब गेल्या पाच वर्षांपासून मधमाश्यांच्या सान्निध्यात कसलीही भीती न बाळगता नियमित एकत्र आयुष्य घालवत आहेत. मधमाशांसाेबत घरातील सर्व सदस्यांची चांगली मैत्री झाली आहे. मात्र घरी येणाऱ्या पाहुणे व नातेवाइकांची काही काळ झोप उडते. बेडरूममध्ये हाॅलमध्ये तसेच अंगणात माशांचा घोळका अंगाभोवती गिरक्या घालत असतो. मात्र या मधमाशांनी आजवर काेणालाही इजा पाेहाचविलीे नाही, हे येथे उल्लेखनीय.
असा चालताे दिनक्रम..
राणी माशीसोबत इतर ४० ते ५० मधमाश्यांचा घोळका तीन किलोमीटरच्या पर्यंतच्या जंगल परिसरात जाऊन अनेक प्रकारच्या फुलातून मध शोषून घेते व तो मधोळात सोडते. ती कुठेही असली तरी जाग्यावर परत येते. विशेषतः अशी की, सकाळी १० ते सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान पाेळाबाहेर पडून लघवी व विष्टा टाकते.
मधमाशा आणि आमचे सहाजणांचे कुटुंब एकत्रच राहते. घरात वावरताना आमची एकमेकांसाेबत धडक होतेच. आम्हाला ओळखतात की काय; पण आम्हाला त्यांचा कुठलाही त्रास नाही, आता मधमाशांसाेबत आमचा नेहमीचा सहवास झाला आहे. - आलोक राॅय, कुंटुंबप्रमुख तथा ग्रामसेवक शंकरनगर.
काय म्हणतात.. पक्षी अभ्यासक...
मधमाशांना जाेपर्यंत कुणी त्रास देत नाही, ताेपर्यंत त्या काेणालाही त्राास देत नाही. जाणूनबजून आग लावून धूर तयार करणे, उष्णता निर्माण करणे, पाेळाला दगड मारणे अशा उचापती केल्यास मधमाशा व्यक्तींवर हल्ला करतात. मानवाने पक्षी व प्राण्यांना त्याच्या अधिवासात राहू दिले पाहीजे. जैवविविधतेत मधमाशांचे माेठे याेगदान आहे, असे गडचिराेली येथील पक्षी अभ्यासक मिलींद उमरे यांनी ‘लाेकमत’ शी बाेलताना सांगितले.