मृतक विद्यार्थ्यांचे कुटुंबीय अनुदानापासून वंचित
By Admin | Updated: June 19, 2016 01:17 IST2016-06-19T01:17:18+5:302016-06-19T01:17:18+5:30
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेच्या अनुदानापासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण

मृतक विद्यार्थ्यांचे कुटुंबीय अनुदानापासून वंचित
गडचिरोली : राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेच्या अनुदानापासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाअंतर्गत सन २०१४-१५ व २०१५-१६ या दोन वर्षात मृत्यूमुखी पडलेले विद्यार्थ्यांचे कुटुंबीय वंचित आहेत.
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १७ जून रोजी राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत सन २०१६-१७ या वर्षाकरिता अनुदान वितरणाचे आदेश काढले. मात्र यामध्ये गडचिरोली जिल्ह्यास वगळण्यात आल्याने जिल्ह्यातील मृतक विद्यार्थ्यांचे कुटुंबीय अनुदानाच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.
पहिली ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या मुला-मुलींना अपघातामुळे धोका झाल्यास नुकसानभरपाई देण्यासाठी राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सन २०१२-१३ पासून राबविली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण विभागाअंतर्गत २१ विद्यार्थी नैसर्गिक आपत्ती व अन्य कारणामुळे मृत्यूमुखी पडले होते. प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी राज्य शासनाकडे १५ लाख ३० हजारांची मागणी करण्यात आली होती. यापैकी मार्च २०१६ मध्ये ७५ हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला. यानंतर उर्वरित विद्यार्थ्यांकरिता १३ लाख ५ हजार रूपयांची मागणी करण्यात आली. मात्र राज्य शासनाच्या वतीने जिल्ह्यासाठी निधी प्राप्त झाला नसल्याची माहिती मिळाली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)