१० महिन्यांत मुलींच्या जन्मदरात घसरण
By Admin | Updated: November 13, 2015 01:22 IST2015-11-13T01:22:38+5:302015-11-13T01:22:38+5:30
मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी देशभर सरकारच्या स्तरावरून व्यापक उपाययोजना केल्या जात आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर राज्यात अतिशय चांगला आहे.

१० महिन्यांत मुलींच्या जन्मदरात घसरण
सुनील चौरासिया गडचिरोली
मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी देशभर सरकारच्या स्तरावरून व्यापक उपाययोजना केल्या जात आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर राज्यात अतिशय चांगला आहे. मात्र २०१५ च्या १० महिन्यात गडचिरोली शहर व जिल्हा सामान्य रूग्णालयात जन्म झालेल्या बालकांमध्ये मुलींच्या जन्मदरात प्रचंड घसरण झाल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या १० महिन्यात ७२४ बालकांचा जिल्हा सामान्य रूग्णालयात जन्म झाला. यामध्ये ३८८ मुले व ३३३ मुली आहेत.
राज्यात मुलींचा जन्मदर झपाट्याने घसरत असल्याने मागील तीन-चार वर्षांपासून सरकारने या प्रश्नाकडे गंभीरतेने लक्ष देऊन स्त्रिभृणहत्या रोखण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहे. गडचिरोली जिल्ह्याचा मुलींचा जन्मदर राज्याच्या तुलनेत अतिशय चांगला आहे. परंतु जानेवारी २०१५ ते आॅक्टोबर २०१५ या कालावधीत मुलींच्या जन्मदरात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात मागील दहा महिन्यांच्या काळात ७२४ बालकांचा जन्म झाला. यामध्ये ३८८ बालके व ३३३ मुुली जन्मल्या. जन्मलेल्या बालकांमध्ये मुलीचे प्रमाण कमी आहे.
गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयात चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील महिलांच्या प्रसुती होतात. जिल्ह्यात ग्रामीण भागात आरोग्य केंद्रात अनेक प्रसुती केल्या जातात. जिल्हा सामान्य रूग्णालयात जन्मदराची विद्यमान आकडेवारी लक्षात घेतल्यास मुलींचा जन्मदर घटल्याचे स्पष्ट होते.
जानेवारी महिन्यात जिल्हा सामान्य रूग्णालयात २२ मुले, २५ मुली, फेब्रुवारी महिन्यात २३ मुले, १४ मुली, मार्च महिन्यात २२ मुले, ३९ मुली, एप्रिल महिन्यात ८५ मुले, ६९ मुली, मे महिन्यात ४७ मुले, ३५ मुली, जून महिन्यात ६५ मुले, ४६ मुली, जुलै महिन्यात ४४ मुले, ३८ मुली, आॅगस्ट महिन्यात ३४ मुले, २७ मुली, सप्टेंबर महिन्यात २६ मुले, २३ मुली, आॅक्टोबर महिन्यात २० मुले, १७ मुलींचा जिल्हा सामान्य रूग्णालयात जन्म झाला. यावरून जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदरात घट येत असल्याचे स्पष्ट होत आहे.
१० महिन्यांत ५८३ नागरिकांचा मृत्यू
गडचिरोली नगर पालिकेने १ जानेवारी ते २ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत ५८३ मृत्यूंची नोंद केली आहे. यामध्ये जानेवारीत ६४, फेब्रुवारी ४९, मार्चमध्ये ७७, एप्रिलमध्ये ४१, मेमध्ये ५३, जूनमध्ये ६८, जुलैमध्ये ५३, आॅगस्ट मध्ये ४४, सप्टेंबरमध्ये ६९, आॅक्टोबरमध्ये ६३ व २ नोव्हेंबरपर्यंत दोन मृत्यूंची नोंद न.प. प्रशासनाने घेतली आहे. महिलांच्या तुलनेत पुरूषांचा मृत्यूदर हा मोठा असल्याचे दिसून येत आहे. जानेवारी ते २ नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या ५८३ मृत्यूमध्ये १९२ महिला व ३९१ पुरूषांचा मृत्यू आहे.