नजर अंदाज पैसेवारी ५६ पैसे
By Admin | Updated: September 23, 2015 05:11 IST2015-09-23T05:11:41+5:302015-09-23T05:11:41+5:30
महसूल विभागाच्या मार्फतीने सप्टेंबर महिन्यात करण्यात आलेल्या नगर अंदाज पीक पाहणीत गडचिरोली जिल्ह्याची सरासरी

नजर अंदाज पैसेवारी ५६ पैसे
दिगांबर जवादे ल्ल गडचिरोली
महसूल विभागाच्या मार्फतीने सप्टेंबर महिन्यात करण्यात आलेल्या नगर अंदाज पीक पाहणीत गडचिरोली जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ५६ पैसे असल्याचे दिसून आले आहे. एकूण १ हजार ६८८ गावांपैकी १ हजार ४४२ गावांची पैसेवारी ६७ पैसेपेक्षा कमी निघाली आहे. सर्वच तालुक्यांची पैसेवारीही ४० ते ६५ यांच्या दरम्यान असल्याचे दिसून आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात सुमारे दोन लाख हेक्टरवर विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी १ लाख ५५ हजार ६४१ हेक्टरवर धान पिकाची रोवणी झाली असल्याचे कृषी विभागाने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा २० टक्के कमी झाले आहे. त्यामुळे अनेक तलाव कोरडे आहेत. तर हजारो हेक्टर जमीन रोवणीअभावी पडिक आहे.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ हजार ६८८ महसूली गावे आहेत. पीक परिस्थितीचा अंदाज यावा यासाठी सप्टेंबर महिन्यात महसूल विभागाच्या मार्फत सर्वच गावांममधील पिकांची पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान काही गावांमधील शेतकऱ्यांची जमीन पडिक असल्याचे दिसून आले. त्याचबरोबर उशिरा रोवणी झाली असल्याने धानाच्या उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता आहे. जलसाठे कोरडे असल्याने पुढे पाऊस न झाल्यास रोवलेल्या धान पिकालाही धोका आहे. या सर्व बाबींचा अंदाज बांधून पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. बहुतांश तालुक्यांची पैसेवारी ४० ते ६५ च्या दरम्यान असल्याचे दिसून येते. बाराही तालुक्यांची सरासरी पैसेवारी ५६ पैसे आहे.
यावर्षी पहिल्यांदाच शासनाने पैसेवारीच्या निकषात बदल केला आहे. ६७ टक्केपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला जाणार आहे. ज्या गावामध्ये ६७ पैशापेक्षा कमी पैसेवारी काढण्यात आली आहे, तेथे दुष्काळसदृश स्थिती असल्याचे मान्य केले आहे. त्या गावांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यामध्ये करण्यात येणाऱ्या पाहणीदरम्यानचे निकष असेच राहून जिल्ह्याची पैसेवारी ६७ पैशापेक्षा कमी आल्यास जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर होईल. अन्यथा दुष्काळग्रस्त जाहीर केला जाणार नाही, अशी परिस्थिती सध्यातरी दिसून येत आहे.
नवीन निर्णयाचा होणार फायदा
यापूर्वी दुष्काळ जाहीर करण्यासाठी ५० पैशाच्या कमी पैसेवारी येणे आवश्यक होते. यावर्षी मात्र शासनाने बदल केला असून ६७ पैसे व त्यापेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांना दुष्काळग्रस्त जाहीर केले जाणार आहे. सद्य:स्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील एकूण १ हजार ६८८ गावांपैकी १ हजार ४४२ गावांची पैसेवारी ६७ टक्केपेक्षा कमी आहे व १० गावांची पैसेवारी ६७ टक्केपेक्षा जास्त आहे. नवीन निर्णयाचा लाभ जिल्ह्याला होईल, अशी आशा आहे.
डिसेंबरच्या पाहणीत ठरणार दुष्काळ
प्रशासनाने आता जाहीर केलेली पैसेवारी अंतिम पैसेवारी नाही. त्यामुळे शासन या पैसेवारीवरून दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा कोणताच निर्णय घेत नाही. राज्यातील पीक परिस्थिती व पाणी टंचाईचा अंदाज यावा व दुष्काळ जाहीर करण्याबरोबरच उन्हाळ्यात शासनाला पाणी टंचाई संदर्भात नियोजन करता यावे, यासाठी सदर पाहणी करण्यात आली आहे. दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातील निर्णय डिसेंबर महिन्यात करण्यात येणाऱ्या पाहणीवरून घेतला जाणार आहे.
६० गावांमध्ये पेरणीच झाली नाही
कमी पावसामुळे जिल्ह्यातील सुमारे ६० गावांमध्ये पेरणीच झाली नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामध्ये धानोरा तालुक्यातील सहा, चामोर्शी तालुक्यातील सहा, आरमोरी एक, कुरखेडा चार, कोरची सहा, अहेरी सहा, एटापल्ली तीन, भामरागड २१ व सिरोंचा तालुक्यातील सात गावांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील पावसाने एक हजार मिमीची सरासरी ओलांडली आहे. त्यामुळे दरवर्षीचा अंदाज बघता पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे, असेच म्हणावे लागेल. मात्र अवेळी पाऊस पडल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. सप्टेंबर महिन्यात पडलेल्या पावसाचा धान पिकाच्या रोवणीस काहीच फायदा नाही. त्यामुळे जमीन पडिक आहे. उशिरा रोवणी झाल्याने धानाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
- सुनील गाडे,
निवासी उपजिल्हाधिकारी गडचिरोली
६७ पैशांपेक्षा कमी पैसेवारीची तालुके व गावे
तालुकागावेतालुक्याची सरासरी
गडचिरोली१२७०.४१
धानोरा२१६०.४७
चामोर्शी१८३०.६३
मुलचेरा५९०.५३
ुदेसाईगंज३८०.५९
आरमोरी९७०.५७
कुरखेडा१२००.५५
कोरची१२१०.५५
अहेरी११८०.५३
एटापल्ली१९१०.६३
भामरागड१०६०.६३
सिरोंचा६६०.६१
एकूण१४४२०.५६