१५ अस्थायी पदांना मुदतवाढ
By Admin | Updated: April 24, 2016 01:27 IST2016-04-24T01:27:09+5:302016-04-24T01:27:09+5:30
वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची आरोग्य सेवेसाठी निकड लक्षात घेऊन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा,

१५ अस्थायी पदांना मुदतवाढ
गडचिरोली : वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची आरोग्य सेवेसाठी निकड लक्षात घेऊन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा, अहेरी, आरमोरी या ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयातील एकूण १५ अस्थायी पदांना ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे सदर अस्थायी डॉक्टर व आरोग्य कर्मचारी पुन्हा आरोग्य सेवेत रुजू होणार आहेत. परिणामी कार्यरत डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवरील भार कमी होऊन आरोग्य यंत्रणा काही प्रमाणात बळकट होणार आहे.
यासंदर्भात राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने २२ एप्रिल २०१६ रोजी शासन निर्णय जारी केला आहे. उपसंचालक, आरोग्य सेवा नागपूर मंडळ, नागपूर यांच्या अधिपत्याखाली कुरखेडा, अहेरी, आरमोरी हे तीन उपजिल्हा रुग्णालय येतात. या रुग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात आली आहे. मात्र त्यांची संख्या कमी आहे. कायमस्वरूपी असलेल्या वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांवरील वाढत्या रुग्णांचा भार कमी करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने या तिन्ही रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांची एकूण १५ पदे भरली. या अस्थायी १५ पदांना १ मार्च २०१५ ते २९ फेब्रुवारी २०१६ पर्यंत मुदतवाढ मिळाली होती. त्यानंतर करार संपुष्टात आल्याने कुरखेडा, अहेरी, आरमोरी या तिन्ही उपजिल्हा रुग्णालयात अस्थायी डॉक्टर व कर्मचारी सेवेतून भारमुक्त झाले. परिणामी या तिन्ही रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता निर्माण झाली. गेल्या अनेक दिवसांपासून या तिन्ही रुग्णालयात पुरेशा वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांअभावी रुग्णांची हेळसांड होत होती.
कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक असलेले डॉ. दीपचंद सोयाम हे एकमेव डॉक्टर सेवा देत आहे. परिणामी त्यांच्यावरील भार वाढला होता. मात्र आता अस्थायी पदांना मुदतवाढ मिळाल्याने या तिन्ही रुग्णालयातील आरोग्य समस्या मार्गी लागणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)