तंटेखोरांची तंमुसमधून होणार हकालपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2017 01:44 IST2017-02-09T01:44:15+5:302017-02-09T01:44:15+5:30
गाव पातळीवर तंटे गावातच मिटविण्याची व्यवस्था निर्माण व्हावी, तसेच सामाजिक शांततेतून गाव समृद्धीकडे वाटचाल करावे,

तंटेखोरांची तंमुसमधून होणार हकालपट्टी
गुन्ह्यांचीही तपासणी : सामाजिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार
देसाईगंज : गाव पातळीवर तंटे गावातच मिटविण्याची व्यवस्था निर्माण व्हावी, तसेच सामाजिक शांततेतून गाव समृद्धीकडे वाटचाल करावे, या उद्देशाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू आहे. मोहिमेच्या अंलबजावणीसाठी गावपातळीवर स्थापन करण्यात आलेल्या समितीत गुंड प्रवृत्तीच्या लोकांची अध्यक्ष, सदस्यपदी निवड झाल्यास मोहीम अपयशी ठरू शकते, हे टाळण्यासाठी शासनाने कडक पाऊल उचलले असून तंटाखोर प्रवृत्तीच्या अध्यक्ष व सदस्यांची समितीतून हकालपट्टी केली जाणार आहे.
वैैयक्तिक वादामुळे गावाचा विकास खुंटतो शिवाय गावात नेहमीच तणावाचे वातावरण राहते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम सुरू आहे. ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हा, तालुका, पोलीस ठाणे व गाव पातळीवर तंटामुक्त समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत प्रतिष्ठित, समजूतदार, सामाजिक जाण असलेले चारित्र्यवान, निर्व्यसनी असलेल्या व्यक्तींचा समावेश केला जातो. समितीच्या पदांपासून गुंड प्रवृत्ती, अवैध व्यवसाय करणारा तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना दूर ठेवण्याचे शासनाचे आदेश आहे. परंतु मागील काही वर्षांत अनेक गावांच्या तंटामुक्त समित्यांवर तंटेखोर व्यक्ती विराजमान आहेत. अशा लोकांमुळे मोहीम यशस्वी होण्यासाठी अडचणी निर्माण होतात. परंतु शासनाने आता कठोर पावले उचलली असून समितीचे अध्यक्ष तथा सदस्यांची निवड करतानाच दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
पूर्वीच्याही पदाधिकाऱ्यांची चौकशी
तंटामुक्त समितीमध्ये पूर्वी नियुक्ती करण्यात आलेल्या अध्यक्ष, सदस्यांवर गुन्हे दाखल असतील तर अशांचीही तपासणी करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे तंमुसमध्ये स्वच्छ प्रतिमेच्या लोकांची निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तंटामुक्त समित्यांमध्ये गावातील प्रभावशाली लोकांची नियुक्ती केली जाते. परंतु नियुक्त केले अनेक पदाधिकारी स्वच्छ प्रतिमेचे असतीलच असे नाही, गाव पातळीवर ग्रामसभेत सदर लोकांची नियुक्ती लोकांच्या बहुमताने होत असताना अनेकदा सदर नियुक्तीचे चारित्र्य तपासले जात नाही. त्यामुळे गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांचीही नियुक्ती तंटामुक्त समितीत केली जाते. अनेकदा एक वर्ष तर काहीवेळा सलग तीन ते चारवेळा असे व्यक्ती पदावर राहिल्याने तंमुस मोहिमेत अडचणी निर्माण होतात.