शोषित, पीडितांनी संघटीत होण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2016 02:16 IST2016-08-22T02:16:04+5:302016-08-22T02:16:04+5:30
जातीवादी व्यवस्थेला खतपाणी घालून काही लोक आपला स्वार्थ साधून घेत आहेत. त्यामुळे आदिवासी, दलित, बहुजन व इतर शोषित, पीडितांचे प्रश्न कायम आहेत.

शोषित, पीडितांनी संघटीत होण्याची गरज
मान्यवरांचा सूर : गडचिरोलीत बहुजनांच्या समस्यांवर विचारमंथन
गडचिरोली : जातीवादी व्यवस्थेला खतपाणी घालून काही लोक आपला स्वार्थ साधून घेत आहेत. त्यामुळे आदिवासी, दलित, बहुजन व इतर शोषित, पीडितांचे प्रश्न कायम आहेत. शोषित, पीडितांना न्याय मिळण्यासाठी जातीवादी व्यवस्था नष्ट करून बहुजन समाजातील शोषित, पीडितांनी संघटीत व्हावे, असा सूर उपस्थित साहित्यीक व मान्यवरांनी काढला.
आदिवासी साहित्य आणि संस्कृती संवर्धन संस्था बल्लारपूरच्या वतीने प्रा. डॉ. विनायक तुमराम लिखीत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर व आदिवासी चळवळ : चर्चा आणि चिंतन’ या वैचारिक ग्रंथाचा विमोचन समारंभ रविवारी येथील गोंडवाना कलादालनात पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत वाहरू सोनवने होते. विशेष अतिथी म्हणून कोर्ट चित्रपटाचे अभिनेते विरा साथीदार, नागपूर विद्यापीठाच्या हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. विणा दाढे तर प्रमुख अतिथी म्हणूून ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत, शिक्षक भारती संघटनेचे विभागीय अध्यक्ष प्राचार्य राजेंद्र झाडे, डॉ. विजय मेश्राम, प्रा. वसंत कन्नाके, प्रा. चंद्रशेखर बांबोळे, बी. डी. आडे, डॉ. पीतांबर कोडापे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रा. डॉ. विनायक तुमराम म्हणाले, आदिवासींचा स्वतंत्र धर्म आहे. अनेक धर्मियांनी आदिवासींना वाटेल तसे आपल्या धर्मात खेचून घेतले. अशा आदिवासींना एकसंघ धर्मात बांधण्याची गरज आहे. १६ नोव्हेंबर २०१६ रोजी गडचिरोलीनजीकच्या दिभना येथे आदिवासी धर्माची स्थापना करण्यात येणार असून या ठिकाणी आदिवासींना दीक्षा देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
वाहरू सोनवने म्हणाले, अतिप्राचीन काळापासून आदिवासी समाजाला नागविण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासींचा इतिहास अधोरेखीत करण्यात आला नाही. जाती, धर्मात तेढ निर्माण न करता सर्वत्र मानव धर्म स्थापन करण्याची गरज आहे, यातून वैैचारिक क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी उपस्थित इतर मान्यवरांनी आदिवासी, दलित, शोषित, पीडित बहुजन समाजातील प्रश्नांवर आपले मत मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील कुमरे, संचालन प्रा. नरेंद्र आरेकर यांनी केले तर आभार वनिशाम येरमे यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)