आंतरराज्यीय पुलाच्या कामाजवळच रेतीचे उत्खनन

By Admin | Updated: July 30, 2015 01:18 IST2015-07-30T01:18:11+5:302015-07-30T01:18:11+5:30

महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड राज्याला जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलाच्या निर्माणाधीन कामापासून २० फूट अंतरावर अवैध रेती उत्खनन सुरू आहे.

Excavation of sand near interstate bridge | आंतरराज्यीय पुलाच्या कामाजवळच रेतीचे उत्खनन

आंतरराज्यीय पुलाच्या कामाजवळच रेतीचे उत्खनन

इरफान पठाण यांची मागणी : रेतीच्या अवैध वाहतूक प्रकरणी तहसीलदार व तलाठ्यावर कारवाई करा
गडचिरोली : महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड राज्याला जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलाच्या निर्माणाधीन कामापासून २० फूट अंतरावर अवैध रेती उत्खनन सुरू आहे. या कामाकडे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यासह पोलीस प्रशासनाचेही दुर्लक्ष आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस इरफान पठाण यांनी केला आहे.
गोदावरी नदीत अवैधरीत्या रेती उत्खनन करून परप्रांतात रेतीची वाहतूक करण्याचे प्रकरण उजेडात आले आहे. या प्रकरणी सिरोंचा येथील तहसीलदार, तलाठी व कंत्राटदार कारवाई यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी इरफान खान यांनी उपविभागीय अधिकारी अहेरी यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
२७ जुलै रोजी आपण व राकाँचे कार्यकर्ते मिळून रेतीची अवैध वाहतूक करणारे एकूण १५ ट्रक आलापल्ली मार्गावर अडविले. याबाबत आपणास माहिती देऊन धाड टाकण्याची विनंती केली. त्यानुसार आपण ट्रक जप्तीची कारवाई केली. मात्र सदर प्रकरणात सिरोंचाचे तहसीलदार, नगरमचे तलाठी यांचा सहभाग आहे. रेतीघाट कंत्राटदाराला यांच्याकडून अभय मिळत आहे. त्यामुळेच गेल्या अनेक दिवसांपासून गोदावरी नदीच्या नगरम घाटातून लाखो ट्रक रेती अवैधरित्या तेलंगणात वाहतूक होत आहे. रेती तस्करीला कंत्राटदाराएवढेच सिरोंचाचे तहसीलदार, नगरमचे तलाठी जबाबदार आहेत. त्यामुळे या सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच रेतीची रक्कम त्यांच्याकडून वसूल करावी, अशी मागणी इरफान खान यांनी केली आहे. रेतीघाट कंत्राटदाराला आवंटीत करण्यात आलेले टीपी बुक जप्त करून त्याची चौकशी करावी, असेही खान यांनी म्हटले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
पोलिसांची चुप्पीच
सिरोंचा येथे अवैध रेती उत्खनन होत असल्याबाबतची माहिती आपण स्थानिक पोलिसांना दिली होती. त्यांना शासनाने रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे अधिकार दिले आहे. मात्र त्यांनी दुर्लक्ष केले, असे इरफान पठाण यांनी सांगितले.

Web Title: Excavation of sand near interstate bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.