वाहन चालविताना प्रत्येकांनी विशेष दक्षता बाळगावी!
By Admin | Updated: January 18, 2017 01:46 IST2017-01-18T01:46:48+5:302017-01-18T01:46:48+5:30
सार्वजनिक रस्त्यावर वाहन चालवित असताना काही विशिष्ट ठिकाणी प्रत्येक वाहनचालकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे,

वाहन चालविताना प्रत्येकांनी विशेष दक्षता बाळगावी!
फासे यांचे प्रतिपादन : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत चित्र प्रदर्शनी
गडचिरोली : सार्वजनिक रस्त्यावर वाहन चालवित असताना काही विशिष्ट ठिकाणी प्रत्येक वाहनचालकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे, अशी दक्षता घेतल्यास अपघाताचा धोका टाळता येतो, असे प्रतिपादन गडचिरोलीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एस. पी. फासे यांनी केले.
रस्ता सुरक्षा अभियानादरम्यान मंगळवारी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत चित्रप्रदर्शनी व रस्ता सुरक्षा विषयक मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य के. एस. विसाळे होते. प्रमुख अतिथी म्हणून मोटर वाहन निरीक्षक एन. जी. बन्सोडे, गटनिदेशक वाळके आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी प्राचार्य विसाळे वाहन निरीक्षक बनसोडे व गटनिदेशक वाळके यांनी वाहतुकीच्या नियमांबाबत मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी. आर. बोढेकर यांनी केले तर संचालन भाष्कर मेश्राम यांनी केले. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
वाहनचालकांनो, अशी घ्या काळजीवाहनचालकांनी वळणावर हॉर्न वाजवून इशारा द्यावा, वाहनाचा वेग कमी करावा, समोरील वाहनाला शक्यतोवर ओव्हरटेक करू नये, आपले वाहन धोकादायक स्थितीत चालवू नये, फुटब्रेक, हँडब्रेकचा योग्य वापर करावा, आपली वाहन नेहमी डाव्या बाजूस ठेवावे.
बसस्टॉपजवळ बस थांबली असल्यास तेथील प्रवाशी खाली उतरेपर्यंत आपल्या वाहनाचा वेग कमी करावा, बस जाईपर्यंत आपले वाहन थांबवावे. रस्त्याच्या कडेला शाळा असलेल्या ठिकाणी विद्यार्थी ये-जा करीत असल्याने वाहनाचा वेग कमी करावा, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नये, रात्री वाहन चालविताना वेग नियंत्रित ठेवावा. अशा प्रकारची खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरटीओ फासे यांनी केले.