शेवटच्या घटकापर्यंत सर्वांना न्याय मिळेल
By Admin | Updated: February 2, 2016 01:23 IST2016-02-02T01:23:02+5:302016-02-02T01:23:02+5:30
शिक्षणाने जग जिंकता येते, त्यासाठी शस्त्राची गरज नाही. न्याय पालिकेवर सर्वसामान्यांना जाती, समाज, लैंगिक भेद न करताना सर्वसामान्यांना समान न्याय देण्याची जबाबदारी आहे.

शेवटच्या घटकापर्यंत सर्वांना न्याय मिळेल
भूषण गवई यांचे प्रतिपादन : आरमोरीत न्यायालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन
आरमोरी : शिक्षणाने जग जिंकता येते, त्यासाठी शस्त्राची गरज नाही. न्याय पालिकेवर सर्वसामान्यांना जाती, समाज, लैंगिक भेद न करताना सर्वसामान्यांना समान न्याय देण्याची जबाबदारी आहे. आरमोरी येथील न्यायालयाची नवी इमारत एक आदर्श असून येथून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सर्वांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केली.
आरमोरी येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या इमारतीचे रविवारी त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नागपूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रदीप देशमुख, प्रमुख जिल्हासत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे, यवतमाळचे प्रमुख जिल्हासत्र न्यायाधीश डी. आर. शिरासाव, सेवानिवृत्त प्रमुख जिल्हासत्र न्यायाधीश अहमद, जिल्हाधिकारी रणजितकुमार, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपविभागीय अधिकारी दामोधर नान्हे, जिल्हा अधिवक्ता संघटनेचे अध्यक्ष अॅड. प्रमोद बोरावार, जिल्हा शासकीय अभियोक्ता सचिन प्रधान, वरिष्ठ अधिवक्ता विजय न्यालेवार, देसाईगंज अधिवक्ता संघाचे अध्यक्ष वारजुकर उपस्थित होते.
सन २०१५-१६ या वित्तीय वर्षात सहा कोटी रूपये निधीतून ही इमारत उभी करण्यात आली आहे, अशी माहिती प्रमुख जिल्हासत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी मार्गदर्शनात दिली. सदर तीन मजली इमारतीत दोन न्यायालयाचे कामकाज होऊ शकेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. इमारतीमध्ये कोर्ट हॉल, संगणक कक्ष, व्हिडीओ कॉन्फरन्स कक्ष, सभा कक्ष, मध्यस्थी केंद्रासाठी स्वतंत्र सभागृह, स्वतंत्र ग्रंथालय, महिला व पुरूष पक्षकारांना बसण्याची सोय, पाण्याची सोय, शौचालयाची सोय आदी सुविधा उपलब्ध करण्यात आले आहे.
यावेळी न्यायालय परिसरात न्यायमूर्तींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी कंत्राटदार तन्मय मेंढे यांचा तसेच कार्यकारी बांधकाम विभागाचे अभियंता यांचाही न्यायाधीशांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आरमोरी बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. पी. ढोरे यांनी जिल्हासत्र न्यायाधीश शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे ३ कोटी ३१ लाख ५८ हजार रूपये निधीतून आरमोरी येथे ही सूसज्ज इमारत उभी झाली. येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व मुख्य न्याय दंडाधिकारी यांचे न्यायालय सुरू करण्यात यावा, अशी मागणी केली. कार्यक्रमाचे संचालन अॅड. कविता मोहरकर यांनी तर आभार दिवाणी न्यायाधीश दि. रा. भोला यांनी मानले. कार्यक्रमाला वकील उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)