दरवर्षी दोन हजार विद्यार्थी जातात बाहेर
By Admin | Updated: July 10, 2015 02:08 IST2015-07-10T02:08:51+5:302015-07-10T02:08:51+5:30
जिल्ह्यात नक्षलप्रभावीत व दुर्गम तालुका अशी कोरचीची ओळख आहे. तालुक्यात बहुतांश ठिकाणी शिक्षणाच्या....

दरवर्षी दोन हजार विद्यार्थी जातात बाहेर
इतर शाळांमध्ये पलायन : कोरची तालुक्यात शिक्षणाच्या असुविधांचा परिणाम
कोरची : जिल्ह्यात नक्षलप्रभावीत व दुर्गम तालुका अशी कोरचीची ओळख आहे. तालुक्यात बहुतांश ठिकाणी शिक्षणाच्या सोयी- सुविधांचा अभाव असल्याने जवळपास दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेण्याकरिता इतर भागात पलायन करतात.
कोरची तालुक्यातील विद्यार्थी दरवर्षी भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेण्याकरिता जातात. जिल्ह्यातील बुध्येवाडा, गोठणगाव, पिंपळगाव, लाखांदूर, तुळशीकोकडी, पळसगाव, अरततोंडी, वडेगाव आदी गावांमध्ये खासगी अनुदानित आश्रमशाळा आहेत. प्रत्येक शाळांमध्ये कोरची तालुक्यातील १०० ते ३०० विद्यार्थी संबंधित शाळेत शिकविणारे शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन जातात. याकरिता शिक्षक पालकांच्या घरी मुक्काम ठोकतात. त्यानंतर त्यांना आहाराची विशेष मेजवानी स्वत: देतात. शिवाय विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके व इतर साहित्य पुरविण्याचे आश्वासनही देतात. त्याचबरोबर काही पालकांना दोन ते तीन हजार रूपयांपर्यंत रक्कमही देत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे व त्यानंतर जिपमध्ये कोंबून घेऊन जातात. त्यामुळे तालुक्यातच शिक्षणाच्या योग्य सुविधा उपलब्ध कराव्या अशी मागणी पालकांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)