अडीच वर्षांनंतरही धानाेरा-रांगी-वैरागड मार्गाचे काम अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:48 IST2021-02-05T08:48:09+5:302021-02-05T08:48:09+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रांगी : धानोरा- रांगी- वैरागड मार्गाच्या रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू ...

Even after two and a half years, the work of Dhanera-Rangi-Vairagad road is still incomplete | अडीच वर्षांनंतरही धानाेरा-रांगी-वैरागड मार्गाचे काम अपूर्णच

अडीच वर्षांनंतरही धानाेरा-रांगी-वैरागड मार्गाचे काम अपूर्णच

लाेकमत न्यूज नेटवर्क

रांगी : धानोरा- रांगी- वैरागड मार्गाच्या रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. या कामात मुळीच गती नसून अडीच वर्षांनंतरही या मार्गाचे काम अपूर्णच आहे. परिणामी, वाहनधारकांना प्रचंड त्रास हाेत आहे. मात्र, या कामात प्रशासकीय यंत्रणा व कंत्राटदाराकडून दिरंगाई हाेत आहे.

दोन महिन्यांपासून रस्त्यावर टाकलेल्या गिट्टीचा त्रास नागरिकांना होत असल्याने कंत्राटदाराने सदर रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी वाहनधारकांनी केलेली आहे. मे २०१८ मध्ये रस्त्यासाठी खोदकाम करण्यात आले. त्यानंतर पावसाळा सुरू झाल्याने काम झाले नाही. त्यानंतर तांत्रिक अडचणी आल्या व काही दिवसांनंतर पावसाने रस्ता वाहून गेला. मार्च २०२० पासून काेरोना संसर्गामुळे देश लाॅकडावूनमध्ये अडकला. धानोरा- रांगी- वैरागड मार्गाचे काम प्रभावित झाले हाेते. सोडे ते मोहली मार्गावर जून, जुलै २०२० मध्ये परत कामाला सुरुवात करण्याकरिता गिट्टी टाकून पसरविण्यात आले. आता काम पूर्ण होईल, अशी नागरिकांची अपेक्षा हाेती. मात्र, ही अपेक्षा फाेल ठरली. मोहली ते रांगी- विहीरगाव १८ किमी मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. गिट्टी बाहेर निघाली असल्याने रस्त्यावरून वाहन चालने कठीण झाले आहे. कंत्राटदारांच्या दुर्लक्षितपणामुळे मागील अडीच वर्षांपासून वाहतूक प्रभावित झाली आहे.

महाराष्ट्र शासनाने धानोरा- रांगी- वैरागड- ठाणेगाव या ४० किमी अंतराचे रुंदीकरण व मजबुतीकरिता निविदा काढली. याचे कंत्राट खाजगी कंपनीला झाले. त्यानंतर धानोराकडून काम करण्याकरिता सोडे गावापासून मोहली गावाजवळपर्यंत संपूर्ण रस्ता खोदण्यात आला. मात्र, प्रत्यक्ष २०१९ पर्यंत कामाला सुरुवात करण्यातच आली नाही; परंतु दररोज चालणाऱ्या जड वाहनाने रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने वाहन चालणे कठीण झाले आहे. मात्र, याची दखल ना लोकप्रतिनिधींनी, ना अधिकाऱ्यांनी घेतली. त्यामुळे या मार्गावरून काेणतेही वाहन धावताना दिसत नव्हते. रांगी ते आरमोरी मार्गावर पावसामुळे मधे-मधे मोठ-माेठे भगदाड पडल्याने हाही रस्ता लोकांचे जीव घेणारा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर मार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बाॅक्स...

बसफेरीअभावी रांगीतील विद्यार्थ्यांचे हाल

रांगीवरून धानोरा रोडवर १० किमी अंतरावर मोहली हे गाव आहे. येथे मॉडेल स्कूल व जिल्हा परिषद हायस्कूल इंग्रजी माध्यम शाळा आहेत. रांगी व निमगाव आणि परिसरातील विद्यार्थी मोहली येथे नियमित ये-जा करतात. अलीकडेच प्रत्यक्ष वर्ग भरविणे सुरू झाले आहे. त्यामुळे विद्यार्थी आता शाळेत जाऊ लागले आहेत. मात्र, धानोरा- रांगी रस्त्याचे काम सुरू असल्याने या मार्गावरील बस फेरी बंद झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यास अडचण निर्माण होत आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी मानव विकास मिशनअंतर्गत रांगी ते धानोरा व ब्रह्मपुरी ते धानोरा, अशी बसफेरी सुरू करण्यात आली होती. मात्र, रस्त्याचे काम कासव गतीने सुरू असल्याने या मार्गावरील बस सेवा बंद करण्यात आली आहे. याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. तरी रांगी ते धानोरा बस फेरी सुरू करण्याची मागणी रांगी येथील विद्यार्थी व पालकांनी केली आहे.

Web Title: Even after two and a half years, the work of Dhanera-Rangi-Vairagad road is still incomplete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.