ग्राम पंचायत निवडणुकीसाठी एटापल्लीचे प्रशासन सज्ज
By Admin | Updated: April 20, 2015 01:30 IST2015-04-20T01:30:34+5:302015-04-20T01:30:34+5:30
तालुक्यातील नऊ ग्राम पंचायतींची सार्वत्रिक निवडणूक २४ एप्रिल रोजी होणार असून निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक व पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.

ग्राम पंचायत निवडणुकीसाठी एटापल्लीचे प्रशासन सज्ज
एटापल्ली/चामोर्शी : तालुक्यातील नऊ ग्राम पंचायतींची सार्वत्रिक निवडणूक २४ एप्रिल रोजी होणार असून निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक व पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.
एटापल्ली तालुक्यातील एटापल्ली, उडेरा, गेदा, गुरूपल्ली, येमली, सोहगाव, जारावंडी, बुर्गी, दिवडी या नऊ ग्राम पंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. या नऊ ग्राम पंचायतींमध्ये ९ हजार ८१२ स्त्री तर १० हजार २६८ पुरूष मतदार आहेत. या सर्वच ग्राम पंचायती नक्षलप्रभावी क्षेत्रामध्ये मोडतात. ग्राम पंचायत निवडणुकीत नागरिकांनी उभे राहू नये, यासाठी नक्षलवाद्यांच्या वतीने नेहमी पत्रकबाजी करण्यात येत आहे. तरीही नागरिकांनी नक्षल्यांच्या पत्रकबाजीला न जुमानता पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यावरून गावकऱ्यांमध्ये ग्राम पंचायत निवडणुकीविषयी कमालीची उत्सुकता असल्याचे दिसून येत आहे.
नागरिकांच्या उत्साहावर पाणी फेरू नये, जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी प्रशासनाच्या वतीनेही जोमात तयारी सुरू करण्यात आली आहे. प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी नक्षल्यांकडून घातपाताच्या कारवाया करून मतदानाच्या प्रक्रियेत बाधा आणण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक व पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. पोलीस पथकांच्या वतीने या भागात नक्षल शोध मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहेत.
एका ग्राम पंचायतीमध्ये पाच ते सहा गावांचा समावेश आहे. प्रत्येक गावाचे अंतर चार ते पाच किमी आहे. नागरिकांना एवढ्या दूर अंतर चालत येऊन मतदान करण्याची पाळी येऊ नये, यासाठी निवडणूक विभागाने गावनिहाय ३६ मतदान केंद्र निर्माण केले आहेत. या प्रत्येक मतदान केंद्रावर निवडणूक निर्णय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना निवडणुकीबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती एटापल्लीचे तहसीलदार संपत खलाटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.