लोहप्रकल्प अहेरी क्षेत्रातच स्थापन करा

By Admin | Updated: May 16, 2017 00:52 IST2017-05-16T00:52:48+5:302017-05-16T00:52:48+5:30

बहुप्रतिक्षित सूरजागड लोह प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा कोनसरी येथे पार पडला. सदर प्रकल्प कोनसरी येथे स्थापन करण्याचे षड्यंत्र सुरू आहे.

Establish Iron Project in Aheri area | लोहप्रकल्प अहेरी क्षेत्रातच स्थापन करा

लोहप्रकल्प अहेरी क्षेत्रातच स्थापन करा

मुख्यमंत्र्यांकडे मागणी : बेरोजगार संघर्ष समितीचे एसडीओंना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : बहुप्रतिक्षित सूरजागड लोह प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा कोनसरी येथे पार पडला. सदर प्रकल्प कोनसरी येथे स्थापन करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. याचा अहेरी विधानसभा क्षेत्रातील बेरोजगारांना कोणताही लाभ मिळणार नाही, त्यामुळे सूरजागड लोहप्रकल्प हा अहेरी विधानसभा क्षेत्रातच स्थापन करण्यात यावा, अशी मागणी सूरजागड लोहप्रकल्प बेरोजगार संघर्ष समितीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अहेरी विधानसभा क्षेत्र अतिसंवेदनशील, नक्षलग्रस्त, दुर्गम व मागासलेला आहे. या क्षेत्रात बेरोजगारीसह अनेक समस्या कायम आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात अहेरी उपविभागात सागवान, बांबू, तेंदू या वनसंपदेसोबतच चुनखडी, लोह, अभ्रक ही खनिज संपत्ती आहे. महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरणविषयक अटींची पूर्तता अहेरी उपविभाग करतो. ३३ टक्के वन असावे, अशी अट आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात वन व खनिज संपत्ती असूनही अहेरी उपविभागात एकही उद्योग स्थापन करण्यात आला नाही. त्यामुळे लायड कंपनीचा लोह प्रकल्प अहेरी विधानसभा क्षेत्रात स्थापन करण्यात यावा, अशी मागणी समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली. सात दिवसांच्या आत शासनाने ही मागणी पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात यईल, असा इशारा जनहितवादी समिती तथा सूरजागड संघर्ष समितीचे संयोजक सुरेश बारसागडे यांनी दिला आहे.
उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देताना नगरसेवक अमोल मुक्कावार, श्रीकांत गद्देकर, चेतन अलोणे, सचिन ओंडरे, उप्पलवार, मिलींद अलोणे, सरिता पुंगाटी, दीक्षा झाडे, मयूर चांदेकर, अक्षय येलावार, निखिल गद्देवार, आदित्य जक्कोजवार, रितेश मोहुर्ले, केतन सिदमशेट्टीवार, सुमित मोतदुरवार, देवेंद्र खतवार आदी उपस्थित होते.

Web Title: Establish Iron Project in Aheri area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.