सुट्यांपूर्वीच शिक्षकांचे पलायन
By Admin | Updated: May 9, 2015 01:46 IST2015-05-09T01:46:04+5:302015-05-09T01:46:04+5:30
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना १० मे ते २५ जून या कालावधीत उन्हाळ्याच्या सुट्या जाहीर केल्या असल्या तरी मराठवाडा, खानदेश व पश्चिम महाराष्ट्रातून ...

सुट्यांपूर्वीच शिक्षकांचे पलायन
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना १० मे ते २५ जून या कालावधीत उन्हाळ्याच्या सुट्या जाहीर केल्या असल्या तरी मराठवाडा, खानदेश व पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या शिक्षकांनी २ मे रोजीच शाळा सोडली आहे. मात्र केंद्रप्रमुख व गटशिक्षणाधिकारी यांना मॅनेज केल्याने त्यांचे पगारही व्यवस्थीत निघणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना यावर्षी सुरुवातीला २ मे पासून सुट्या जाहीर करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांचा निकाल १ मे रोजी महाराष्ट्र दिनी घोषित करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. त्यानुसार शिक्षकांनी २ मे पासून उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये गावाकडे जाण्याची तयारी सुरू केली होती. मात्र ऐन वेळेवर गडचिरोली जिल्ह्यातील २२० शिक्षकांच्या बोगस बदल्या रद्द करण्यात आल्या व त्या शिक्षकांना काम करीत असलेल्या ठिकाणावरून भारमुक्त करून त्यांच्या जुन्या ठिकाणी रूजू होण्याचे आदेश देण्यात आले होते. या शिक्षकांना रूजू होता यावे, यासाठी शिक्षकांच्या सुट्या २ मे ऐवजी १० मे पासून जाहीर करण्यात आल्या. मात्र मराठवाडा, पश्चिम विदर्भ व खानदेशातील शिक्षकांनी शिक्षण विभागाच्या आदेशाला न जुमानताच २ मे रोजीच जिल्हा सोडला व स्वत:चे गाव गाठले आहे. असे प्रकार दुर्गम भागातील शाळांमध्ये जास्त घडले आहेत. या शिक्षकांनी पद्धतशिरपणे गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुख यांना मॅनेज केले आहे. त्यामुळे याबाबतची वाच्छता उघडपणे केली जात नसल्याचे दिसून येत आहे. गावातील नागरिकही २ मे पासून शाळा बंद झाल्याचे समजून शिक्षकांबाबत कोणतीही तक्रार करीत नाही. धानोरा एटापल्ली, भामरागड, कोरची, सिरोंचा या दुर्गम भागातील शाळांमध्ये कार्यरत असलेल्या जवळपास ४०० शिक्षकांनी अवैध पद्धतीने शाळा सोडली आहे. शिक्षक शाळेत नियमितपणे येत आहे की नाही हे तपासण्याची जबाबदारी केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी यांची आहे. मात्र हेच अधिकारी मॅनेज झाले असल्याने कारवाई कोण करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. (नगर प्रतिनिधी)